गेल्या दहा दिवसांतील सर्वात मोठी निर्देशांक झेप घेणाऱ्या भांडवली बाजारांनी सप्ताहाची अखेर नव्या टप्प्यावर स्थिरावत केली. सेन्सेक्ससह निफ्टी हा मुख्य भांडवली बाजारांचा निर्देशांक आता सर्वोच्च स्तरावर पोहोचला आहे.
सलग तिसऱ्या व्यवहारात वाढ नोंदविताना सेन्सेक्स शुक्रवारी तब्बल ३१८.९५ अंश वाढीसह २४,६९३.३५ या ऐतिहासिक उच्चांकाला बंद झाला. तर निफ्टीनेही ९०.७० अंश वाढ राखत ७,३६७.१० या विक्रमी टप्पा गाठला.
भाजपप्रणीत लोकशाही आघाडीला निर्विवाद बहुमत मिळाल्याचा आनंद साजरा करणारा शेअर बाजार आता नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीकडे विक्रमाची नोंद करत कूच करू लागला आहे.
प्रत्यक्ष येत्या सोमवारी नव्या मंत्रिमंडळाचा शुभारंभ होताना बाजार सप्ताहाच्या पहिल्या दिवशी काय प्रतिक्रिया देतो, यावर आता गुंतवणूकदारांची नजर असेल. मोदी मंत्रिमंडळातील मंत्री आणि त्यांच्या खात्यांवर बाजार कदाचित व्यवहार करेल.
तत्पूर्वी, सप्ताहअखेरचे व्यवहार नोंदविताना मुंबई शेअर बाजारात शुक्रवारी बँक, तेल व वायू, भांडवली वस्तू, वाहन कंपन्यांचे समभाग उंचावले. तिमाही नफ्यात घसरण राखूनही स्टेट बँकेचा समभाग जवळपास दुहेरी टक्केवारीत वाढला.
सेन्सेक्समधील रिलायन्स, ओएनजीसी, एल अ‍ॅण्ड टी, एचडीएफसी, मारुती सुझुकी, आयसीआयसीआय बँक, सेसा स्टरलाइट, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र यांच्या समभागांना मागणी राहिली. व्यवहारात सेन्सेक्स २४,७४५.८६ पर्यंत गेला.
गुजरातमधील कार्य बघता मोदींचे सरकार ऊर्जा क्षेत्राला उत्तेजना देण्याच्या आशेने शेअर बाजारातील ऊर्जा कंपन्यांचे समभाग वधारले. यामध्ये एनटीपीसी, टाटा पॉवर, अदानी पॉवर, रिलायन्स पॉवर, पॉवर ग्रिड, जेपी पॉवरही उंचावले.
दोन दिवसांपूर्वीचा २४,३७६.८८ हा विक्रम मागे टाकताना सेन्सेक्सने १३ मे रोजीची एकाच सत्रातील ३२० अंशांची उडीही खुजी ठरविली. जवळपास शतकी वधारणेने निफ्टीही २२ मे रोजीच्या ७,२७६.४० या उच्चांकापासून अधिक वर गेला.
रुपयाची मात्र माघार
मुंबई : परकीय चलन व्यवहारात सलग चौथ्या आठवडय़ात वाढ नोंदविणाऱ्या रुपयाने सप्ताहअखेर पाच पैशांची घसरण नोंदविली. यामुळे डॉलरच्या तुलनेत स्थानिक चलन गेल्या ११ महिन्यांच्या उच्चांकापासून माघारी फिरला असून आता तो ५८.५२ वर स्थिरावला आहे.
सोने आणखी घसरले
मुंबई : सलग सातव्या दिवशी घसरणारे सोने शुक्रवारी तोळ्यासाठी २७,८०० रुपयांच्याही खाली आले. यामुळे मुंबईच्या सराफ बाजारात सोने दराने गेल्या महिन्याभराचा तळ गाठला आहे. स्टॅण्डर्ड आणि शुद्ध हे दोन्ही प्रकारचे सोने तोळ्यामागे १०० रुपयांनी कमी होऊन १० ग्रॅमसाठी अनुक्रमे २७,५९० रुपये व २७,७४० रुपयांवर आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा