मुंबई : जागतिक पातळीवरील सकारात्मक संकेत आणि त्या परिणामी देशांतर्गत पातळीवर गुंतवणूकदारांनी बँकिंग, वित्त आणि माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांमध्ये खरेदीचा उत्साह दाखवल्याने सेन्सेक्सने सोमवारच्या सत्रात ७६० अंशांची कमाई केली. सलग दुसऱ्या सत्रात निर्देशांकांची आगेकूच कायम असून दोन सत्रांत मिळून सेन्सेक्सने १,१०५ अंशांची भर घातली आहे.

सप्ताहारंभी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ७६०.३७ अंशांनी म्हणजेच १.४२ टक्क्यांनी वधारून ५४,५२१.१५ पातळीवर बंद झाला. दिवसभरातील सत्रात त्याने ७९५.८८ अंशांची झेप घेत ५४,५५६.६६ या उच्चांकी पातळीला स्पर्श केला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये २२९.३० अंशांची (१.४३ टक्के) वाढ झाली आणि तो १६,२७८.५० पातळीवर स्थिरावला.

अमेरिकेत महागाई दराने ४० वर्षांचे उच्चांक मोडीत काढल्याने अमेरिकी मध्यवर्ती बँक- फेडरल रिझव्‍‌र्हकडून मोठी व्याजदर वाढीची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र अमेरिकेतील किरकोळ विक्रीची आकडेवारी प्रसिद्ध झाली असून अर्थव्यवस्थेत मागणीला चालना मिळाल्याचे निदर्शनास आल्याने फेडरल रिझव्‍‌र्हकडून आक्रमकपणे व्याजदर वाढीची शक्यता काहीशी कमी झाल्याने गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे.

दुसरीकडे विक्रमी चलनवाढ रोखण्यासाठी युरोपियन सेंट्रल बँकेकडून चालू आठवडय़ात होणाऱ्या बैठकीत दीर्घावधीनंतर व्याजदर वाढविले जाणार आहेत, असे जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले.

सेन्सेक्समध्ये इंडसइंड बँकेच्या समभागात सर्वाधिक ४.३६ टक्क्यांची वाढ झाली. त्यापाठोपाठ माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील इन्फोसिस ४.१६ टक्के, टेक मिहद्र ३.६७ टक्के, विप्रो २.७७ आणि  टीसीएस २.२३ टक्क्यांनी वधारला. तसेच वित्त आणि बँकिंग क्षेत्रातील बजाज फिनसव्‍‌र्ह, अ‍ॅक्सिस बँक, कोटक बँक, आयसीआयसीआय बँक आणि स्टेट बँकेचे समभाग प्रत्येकी २.२५ टक्क्यांपर्यंत तेजी दर्शवीत होते. दुसरीकडे, डॉ. रेड्डीज, एचडीएफसी बँक, मिहद्र अँड मिहद्र आणि मारुतीच्या समभागात घसरण झाली.

रुपयाचा ८० च्या पातळीला स्पर्श

मुंबई : अमेरिकी डॉलर पुढे रुपयाने सोमवारच्या सत्रात १५ पैशांची गटांगळी घेत ७९.९७ रुपयांची नीचांकी पातळी गाठली. आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या किमतीत पुन्हा झालेली वाढ आणि परकीय गुंतवणूकदारांकडून निधीचे अविश्रांत निर्गमन सुरू असल्याने रुपयातील घसरण कायम आहे. रुपया गेले काही दिवस सलगपणे नवनवीन नीचांकपद गाठत चालला आहे. सोमवारी आंतरबँक चलन व्यवहारात, रुपयाने ७९.७६ या पातळीपासून व्यवहारास सुरुवात केली. त्यांनतर दिवसभरातील सत्रात रुपयातील घसरण अधिक वाढल्याने रुपयाने ८० रुपयांच्या पातळीस स्पर्श केला. शुक्रवारच्या सत्रातदेखील डॉलरच्या तुलनेत रुपया ८० रुपयांच्या पातळीवरून १७ पैशांनी पुन्हा सावरत ७९.८२ पातळीवर स्थिरावला होता.

Story img Loader