इराकमधील युद्धसदृश स्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती नऊ महिन्यांच्या उच्चांकाला पोहोचलेल्या पाहून चिंतित गुंतवणूकदारांनी स्थानिक भांडवली बाजारात मोठय़ा घसरणीने क्षोभ व्यक्त केला. सेन्सेक्ससह निफ्टीने एकाच व्यवहारातील गेल्या चार महिन्यांतील सर्वात मोठी आपटी नोंदविली. परिणामी, सेन्सेक्स ३४८.०४ अंश घसरणीसह थेट २५,२२८.१७ पर्यंत, तर शतकी घट (१०७.८० अंश) नोंदवून राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक निफ्टीदेखील ७,५४२.१० पर्यंत खाली आला. दोन्ही निर्देशांकांनी तब्बल दीड टक्क्यांच्या घरात घसरण राखली.
औद्योगिक उत्पादन व महागाई दराच्या दिलासादायी आकडय़ांच्या पाश्र्वभूमीवर रिझव्र्ह बँकेकडून व्याजदराबाबत सहानुभूती दाखविली जाईल या आशेवर भांडवली बाजारात गुरुवारी तेजीचे व्यवहार झाले होते. सेन्सेक्सने दिवसअखेर १०० हून अधिक अंशांची वाढ नोंदविली होती. बाजाराची सप्ताहअखेरच्या दिवसाची सुरुवातही तेजीसहच झाली. एप्रिलमधील वाढलेला औद्योगिक उत्पादन व मेमधील सावरलेला किरकोळ महागाई दर याचे स्वागत गुंतवणूकदारांनी निर्देशांकाला व्यवहारात २५,६८८.३१ पर्यंत नेऊन ठेवत केले. यानंतर मात्र आंतरराष्ट्रीय घडामोडींचा बाजारावर विपरित परिणाम दिसून आला.
इराकमधील युद्धसदृश स्थितीपोटी कच्च्या तेलाचे दर नऊ महिन्यांच्या उच्चांकाला जाऊन पोहोचताच बाजारात दबाव निर्माण झाला. यातून सेन्सेक्समधील तब्बल २६ समभागांचे मूल्य घसरणीत परावर्तित झाले, तर क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये माहिती तंत्रज्ञान हा केवळ एक निर्देशांक वगळता, उर्वरित सर्व ११ क्षेत्रीय निर्देशांक घसरणीत राहिले. समभागांमध्ये अॅक्सिस बँक, टाटा स्टील, हीरो मोटोकॉर्प हे नुकसानीकरिता आघाडीवर राहिले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये सर्वाधिक फटका बांधकाम क्षेत्राला तब्बल ५.२४ टक्क्यांच्या घसरणीच्या रूपात बसला.
सत्रात सेन्सेक्स २५,१७१.६१ पर्यंत नीचांकाला आला होता, तर व्यवहारात ७,६७८.५० पर्यंत झेपावणारा निफ्टीदेखील सत्रात ७,५२५.३५ पर्यंत खाली आला. दिवसअखेर त्यात शतकी आपटी नोंदली गेली. इराकमुळे तेल दरांबरोबरच भारतीय चलनातही शुक्रवारी मोठी हालचाल नोंदविली गेली. शिवाय बाजारातील सूचिबद्ध तेल विपणन व विक्री कंपन्यांचे समभाग मूल्यदेखील अस्थिर झाले. तेल व वायू क्षेत्रातील केवळ पेट्रोनेट एलएनजी वगळता इतर सर्व नकारात्मक यादीत राहिले.
एकाच व्यवहारातील तब्बल १.३६ टक्के घसरणीने सेन्सेक्सने सत्रात गेल्या चार महिन्यांतील सर्वात मोठी घसरण नोंदविली. मुंबई निर्देशांकाने यापूर्वी २७ जानेवारी रोजी ४२६.११ अंश घट राखली होती. त्या वेळी बाजारावर रिझव्र्ह बँक तसेच अमेरिकन फेडरल बँकेच्या नियोजित बैठकांचे सावट होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा