* निकाल परिणामाने अस्वस्थता
* मुंबई निर्देशांकात ६०० अंश व्यवहार आपटी; पतमानांकन संस्थांचा दिलासा
दिवाळीतील पहिल्या व्यवहारात तब्बल ६०० अंश आपटी अनुभवताना मुंबई शेअर बाजारामध्ये सप्ताहारंभीच अस्वस्थता अनुभवली गेली. बिहारमध्ये केंद्रातील सत्ताधारी भाजपा आघाडीला मिळालेल्या अपयशाने दिवसअखेरही गुंतवणूकदारांनी समभागांची विक्री केल्याने सेन्सेक्स १४३.८४ अंश घसरणीसह २६,१२१.४० तर निफ्टी ३९.१० अंश घसरणीसह ७,९१५.२० वर थांबला. अर्थव्यवस्थेबाबत खुद्द देशाचे अर्थमंत्री तसेच विविध पतमानांकन संस्थांनी काहीसा दिलासा व्यक्त केल्याने बाजारातील मोठी घसरण दिवसअखेर थांबली.
दिवाळसणाला गेल्या शनिवारीच खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. मात्र सण कालावधीतील बाजारातील व्यवहाराचा सोमवारचा दिवस पहिला होता. त्यातच रविवारी बिहार विधानसभेतील अनपेक्षित निकालाचे पडसाद बाजारात उमटणे स्वाभाविकच होते.
शुक्रवारच्या किरकोळ घसरणीनंतर सोमवारच्या मुंबई शेअर बाजाराचे व्यवहार सुरुवातीलाच ६०८ अंश घसरण नोंदवित होते. तर निफ्टीचा स्तरही यावेळी जवळपास २०० अंश घसरणीमुळे थेट ७,८०० पर्यंत येऊन ठेपला. सेन्सेक्सने यामुळे २६ हजाराच्याही खाली प्रवास नोंदविला. मुंबई निर्देशांकातील यापूर्वीची सलग तीन व्यवहारातील आपटी ही ३२५.३५ अंशांची होती. सोमवारच्या व्यवहारात सेन्सेक्स २५,६५६.९० पर्यंत तळात तर २६,१९३.१७ पर्यंत सावरला. मुंबई निर्देशांक आता महिन्याच्या खोलात आहे. सत्रात ७,८०० चा स्तर सोडणारा निफ्टी व्यवहारा दरम्यान ७,७७१.७० पर्यंत घसरला. तर ७,९३७.७५ पर्यंत मजल मारल्यानंतर तो ७,९०० च्या वर राहण्यात यशस्वी ठरला.
बाजारात दिवसभर असे मोठय़ा घसरणीचे चित्र कायम होते. राजकीय घडामोडींचे पडसाद देशाच्या अर्थव्यवस्थेवर होण्याबाबत पतमानांकन संस्थांनी साशंकता व्यक्त केल्याने बाजारातील मोठी घसरण दिवसअखेर काहीशी थांबली. मात्र सलग चौथ्या व्यवहारातील घसरण बाजारात कायम राहिली. डॉलरच्या तुलनते ७७ पैशांनी घसरणाऱ्या रुपयाचाही बाजारावर नकारात्मक परिणाम नोंदला गेला. अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही, भारतीतील ठोस आर्थिक सुधारणा कायम असतील, ही दिलेली ग्वाही बाजाराला मोठय़ा घसरणीपासून थोपवू शकली.
सेन्सेक्समधील ३० पैकी दिवसअखेर १९ समभागांचे मूल्य घसरले. यात सन फार्मा, भेल, डॉ. रेड्डीज, गेल, विप्रो, सिप्ला, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, लार्सन अॅन्ड टुब्रो, कोल इंडिया, ओएनजीसी, हिंदाल्को, एनटीपीसी, भारती एअरटेल, टीसीएस, बजाज ऑटो हे आघाडीवर राहिले. तर टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, वेदांता, आयटीसी, स्टेट बँक, ल्युपिन, रिलायन्स, टाटा स्टील, महिंद्र अॅन्ड महिंद्र, अॅक्सिस बँक हे तेजीच्या यादीत राहिले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये स्थावर मालमत्ता क्षेत्राला सर्वाधिक घसरणीला सामोरे जावे लागले. निर्देशांक २.२० टक्क्य़ांनी खाली आला. तर आरोग्यनिग, पायाभूस सेवा, भांडवली वस्तू, ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान, बँक निर्देशांकही घसरले. मुंबई शेअर बाजारातील स्मॉल व मिड कॅप निर्देशांकांमध्ये मात्र वाढ नोंदली गेली.
सेन्सेक्स २६,१००; तर निफ्टी ७,९०० वर
मुंबई शेअर बाजारातील स्मॉल व मिड कॅप निर्देशांकांमध्ये मात्र वाढ नोंदली गेली.
Written by झियाऊद्दीन सय्यदझियाउद्दीन सय्यद
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-11-2015 at 03:28 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex trims most of its losses to end 144 points down nifty closes at