सलग तिसऱ्या व्यवहारात घसरण नोंदविताना सेन्सेक्सने मंगळवारी २८ हजारांचा तर निफ्टीने ८,५००चा स्तर सोडला. वस्तू व सेवा कराच्या माध्यमातून आर्थिक सुधारणांना बसत असलेली खीळ पाहून गुंतवणूकदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
२३५.६३ अंश घसरणीसह सेन्सेक्स २७,८६६.०९ वर तर ६३.२५ अंश घसरणीसह निफ्टी ८,४६२.३५ वर येऊन ठेपला. प्रमुख निर्देशांकांचा हा गेल्या १० दिवसांतील तळ आहे. डॉलरच्या तुलनेत ६४ च्या खाली घसरणाऱ्या रुपयाची चिंताही या वेळी बाजारात वाहिली गेली.
संसदेच्या मान्सून अधिवेशनाला अवघे दोनच दिवस शिल्लक राहिले असताना वस्तू व सेवा कर तसेच जमीन हस्तांतरण विधेयकाबाबतचा प्रवास अधिक अस्पष्ट झाला. राज्यसभेतील विरोधकांचा गोंधळ पाहता ही विधेयके संसदेत पारित होण्याबाबत बाजारातील व्यवहारादरम्यान शंका उपस्थित केली गेली.
मंगळवारच्या व्यवहारात २८ हजारांपासून फारकत घेणाऱ्या सेन्सेक्सने गेल्या सलग तीन व्यवहारांत मिळून ४३२.०४ अंशांचे नुकसान सोसले आहे. सेन्सेक्सने मंगळवारी २८ हजारांचा टप्पा तर सोडलाच शिवाय त्याचा २७,९०० खालील प्रवास हा ३० जुलैनंतरचा किमान राहिला. त्याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने त्याचा अनोखा ८,५०० स्तरही सोडला. निफ्टी सप्ताहारंभीच्या व्यवहारात ८,६०० पर्यंत गेला होता.
मुंबई निर्देशांक सत्रादरम्यान २८,२०५.१२ पर्यंत झेपावला होता. दिवसअखेर मात्र त्यात कमालीचा उतार दिसला. टाटा स्टील, हिंदाल्को, टाटा मोटर्स, कोल इंडिया, वेदांता, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्थान यूनिलिव्हर, ओएनजीसी, भेल, महिंद्र अॅन्ड महिंद्र, लार्सन अॅन्ड टुब्रो, एचडीएफसी, भारती एअरटेल आदींचे मूल्य रोडावले. सेन्सेक्समधील २३ समभाग घसरले. स्थावर मालमत्ता, बँक, वाहन, भांडवली वस्तू, तेल व वायू क्षेत्रातील समभागांचे मूल्य घसरले. मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांकांमध्ये अनुक्रमे ०.४६ व १.१३ टक्क्यांपर्यंत घसरण झाली. भक्कम डॉलरमुळे टीसीएस, एन्फोसिस, विप्रोचे समभाग मूल्य मात्र २ टक्क्यांपर्यंत उंचावले.
परकी चलन व्यासपीठावर रुपयाने मंगळवारी ६४च्या खाली प्रवास सुरू करताना तब्बल ४० पैशांची आपटी नोंदविली होती. दिवसअखेरही स्थानिक चलन ६४च्या खालीच स्थिरावले. भारताबरोबरच प्रमुख आशियाई देशांच्या चलनाचाही सध्या डॉलरसमोर घसरणीची कामगिरी आहे. चिनी युआनच्या दशकभरातील मोठय़ा घसरणीने एकूणच चीन, हाँगकाँग, जपान, सिंगापूर, दक्षिण कोरिया, तैवान या अन्य आशियाई देशांच्या प्रमुख निर्देशांकांमध्ये एक टक्क्याहून अधिक घसरण नोंदली गेली.
अर्थसुधारणांतील खोळंब्यासह निर्देशांक तेजीलाही खीळ
सलग तिसऱ्या व्यवहारात घसरण नोंदविताना सेन्सेक्सने मंगळवारी २८ हजारांचा तर निफ्टीने ८,५००चा स्तर सोडला. वस्तू व सेवा कराच्या माध्यमातून आर्थिक सुधारणांना बसत असलेली
First published on: 12-08-2015 at 06:04 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex tumbles 236 points to crack below 28000 mark