केंद्रीय अर्थसंकल्प मांडून झाल्यानंतर त्याचे अत्यंत प्रतिकूल पडसाद शेअर बाजारात उमटले आहेत. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स हा निर्देशांक तब्बल ९८८ अंकांनी कोसळला आहे. विमा क्षेत्रातील कंपन्यांसह वाहन उद्योग, पायाभूत सुविधा व धातू क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सचीही मोठ्या प्रमाणावर विक्री करण्यात आली ज्यामुळे त्यांच्या शेअर्सचे भाव गडगडले.

आयडीबीआय बँकेमध्ये निर्गुंतवणूक करण्याचे सीतारामन यांनी जाहीर केल्यामुळे या बँकेच्या शेअर्सना मागणी आल्याचे दिसले. आयडिबीआय बँकेचा शेअर काही प्रमाणात वधारला. मात्र बहुतेक सर्व क्षेत्रांमधल्या कंपन्यांच्या शेअर्सच्या विक्रीचा कल दिसून आल्यामुळे सेक्टोरियल इंडायसेसमध्ये पडझड झाल्याचे बघायला मिळाले.

आयपीओच्या माध्यमातून आयुर्विमा महामंडळांमध्ये निर्गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केल्यानंतर विमा क्षेत्रातल्या कंपन्यांच्या शेअर्सची विक्री मोठ्या प्रमाणावर झाली.

बाजार बंद होताना सेन्सेक्स ९८७.९६ अंकांनी किंवा २.४३ टक्क्यांनी घसरला व ३९,७३५.५३ वर स्थिरावला.

Story img Loader