नव्या सप्ताहाची सुरुवात भांडवली बाजारांनी तेजीसह केली. १५३.९५ अंश वाढीसह सेन्सेक्स २७,३९५.७३ वर पोहोचला. तर ४५.६० अंश वधारणेने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक ८,२०० च्या पुढे ८,२४६.३० पर्यंत गेला.
मुंबई शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकात सलग दुसऱ्या सत्रात वाढ नोंदली गेली आहे. गेल्या व्यवहारात सेन्सेक्समध्ये ३३.१७ अंश वाढ झाली होती. बाजारात सोमवारी पोलाद, वाहन, ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातील समभागांना मागणी राहिली. २०१४ संपण्यास काही दिवस उरले असतानाच चालू आर्थिक वर्षांतील विकास वेगाबाबत केंद्र सरकारने उंचावणारा आशावाद व्यक्त केल्याने भांडवली बाजारातही चैतन्य पसरले.
मुंबई निर्देशांक सप्ताहारंभीच्या व्यवहारात २७,५०७.२५ पर्यंत उंचावला होता. तर २७,५०० पुढील टप्प्यात गुंतवणूकदारांकडून नफेखोरी साधली गेल्याने निर्देशांक सत्रात २७,२६६.४९ पर्यंत घसरला. दिवसअखेर त्यात शुक्रवारच्या तुलनेत जवळपास दीडशे अंशांची वाढ झाली.
eco03९ डिसेंबरनंतर भांडवली बाजारात गेल्या सलग १२ सत्रांपासून विदेशी निधीचा ओघ वाढता राहिला आहे. स्थानिक बाजारातील तेजीला अन्य आशियाई प्रमुख निर्देशांकातील वाढीची साथ लाभली.
सेन्सेक्समधील २५ समभागांचे मूल्य वधारले. यामध्ये सेसा स्टरलाइट, कोल इंडिया, हिंदाल्को, टाटा स्टील, टाटा मोटर्स, हीरो मोटोकॉर्प, सन फार्मा, भेल यांची आघाडी राहिली. तर भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र, अ‍ॅक्सिस बँक, स्टेट बँक या पाच समभागांचे मूल्य नफेखोरीने घसरले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये २.३६ टक्क्यांसह पोलाद निर्देशांक घसरणीत आघाडीवर राहिला. पाठोपाठ ग्राहकोपयोगी वस्तू, आरोग्य निगा, ऊर्जा, तेल व वायू, माहिती तंत्रज्ञान निर्देशांकांमध्ये घसरण नोंदली गेली. स्मॉल व मिड कॅप निर्देशांकही अनुक्रमे ०.५३ व ०.८७ टक्क्यांनी वधारले.

रुपया १३ महिन्याच्या नीचांकात
डॉलरच्या तुलनेत रुपयाने सप्ताहारंभीच तब्बल १० पैशांची घसरण नोंदविल्याने स्थानिक चलन आता गेल्या १३ महिन्यांच्या तळात विसावले आहे. परकी चलन व्यवहारात रुपया सोमवारी ६३.६७ पर्यंत घसरला. नव्या सप्ताहाचा प्रारंभ करताना रुपया सकाळच्या सत्रात ६३.६६ अशा नरम पातळीवरच होता. सत्रात तो ६३.६२ वर पोहोचला. मात्र त्याचा दिवसातील तळ ६३.७१ पर्यंत विस्तारत गेला. १२ नोव्हेंबर २०१३ नंतर रुपया प्रथमच इतक्या किमान स्तरावर आला आहे. वर्षभरापूर्वी तो ६३.७१ वर होता.

Story img Loader