संथ अर्थव्यवस्था, वाढती महागाई आणि चिंताजनक वित्तीय तूट या धर्तीवर भारताचे पतमानांकन कमी करण्याबाबत ‘फिच’ने दिलेल्या इशाऱ्याने देशातील सरकारसह भांडवली बाजार, चलन बाजारही मंगळवारी ढवळून निघाले. दरम्यान सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या ५.३ टक्के वित्तीय तूट राखण्यात यश येईल, या सरकारच्या भरवशाने ‘सेन्सेक्स’ही घसरणीतून सावरून दिवसअखेर ५१ अंशांनी वधारला; तर ‘निफ्टी’ने ६ हजारावरील स्तर पुन्हा गाठला. चलन बाजारात रुपयाही डॉलरच्या तुलनेत ५५ च्या गर्तेतून वर आला.
जपानच्या टोकियोत आयोजित एका परिषदेदरम्यान ‘फिच’ या जागतिक पतमानांकन संस्थेने भारताच्या अर्थव्यवस्थेविषयी चिंता व्यक्त केली. या देशाने वाढत्या वित्तीय तुटीवर नियंत्रण न मिळविल्यास संभाव्य पतमानांकनाबाबत शंका उपस्थित करण्यात आली. अर्थव्यवस्थेची मंद गती आणि वाढती महागाई हेदेखील सरकारी उपाययोजना, धोरणे न राबविण्याचा परिपाक असल्याचा निष्कर्ष काढला गेला. गेल्याच महिन्यात ‘स्टॅण्डर्ड अॅण्ड पूअर्स’ या अन्य एका जागतिक पतमानांकन संस्थेनेही भारताच्या अर्थव्यवस्थेत सुधार न झाल्यास येत्या दोन वर्षांच्या कालावधीत देशाचे पतमानांकन कमी करण्याची अद्याप एक-तृतियांश शक्यता असल्याचे नमूद केले होते. त्यानंतर आता ‘फिच’च्या ताजा इशाऱ्याची दखल थेट सरकारलाही घ्यावी लागली.
याबाबत लगेचच सरकारकडून चालू आर्थिक वर्षांत वित्तीय तुटीवर नियंत्रण राखले जाईल आणि २०१२-१३ मधील सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत ते प्रमाण ५.३ टक्क्यांवर ठेवण्याचे उद्दिष्ट सरकार निश्चितच गाठेल, असे केंद्रीय अर्थ व्यवहार विभागाचे सचिव अरविंद मायाराम यांनी राजधानीत तडक खुलासा केला. सरकारची पावले योग्य दिशेने पडत असून पतमानांकन कमी होण्याच्या शक्यतेने घाबरून जाण्याचे कारण नाही. वित्तीय सुधारणा राबविण्याच्या तयारीत सरकार असताना त्या ध्येयापासून विचलित करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही मायाराम यांनी केला.
‘निफ्टी’ पुन्हा ६ हजारावर
‘फिच’च्या इशाऱ्याचा शेअर बाजारावर प्रतिकूल परिणाम दिसून आला. कालच्या सत्रात ९२.६६ अंश घसरण नोंदविणारा ‘सेन्सेक्स’ आज दिवसभरात या चिंतेने दुपारच्या सत्रातच १६,६०० च्या काठावर येऊन ठेपला होता. पण सरकारच्या आश्वस्त करणाऱ्या खुलाशाने गुंतवणूकदारांनी पुन्हा उत्साहाने खरेदी आरंभली आणि सेन्सेक्सला १९,७४२.५२ वर नेऊन ठेवले. कालच्या तुलनेत त्यात ५१.१० अंशांची वाढ दिवसअखेर नोंदली गेली. ‘निफ्टी’ही १३.३० अंश वाढीमुळे ६ हजारावरच्या टप्प्यावर, ६,००१.७० वर पोहोचला. आयटीसी, एचडीएफसी यांची ‘सेन्सेक्स’मधील वाढीबाबत आघाडी राहिली. ‘बँक ऑफ अमेरिका मेरिल लिन्च’ने राष्ट्रीयीकृत स्टेट बँकेचे मानांकन उंचावल्याने बँकेचा समभागही एक टक्क्याने वधारला.
स्थानिक चलन भक्कम
‘फिच’च्या मानांकनानंतर कालच्या सत्रात डॉलरच्या तुलनेत ५५ च्या खाली गेलेला रुपयाही आज प्रारंभी ५५.३८ पर्यंत घसरला होता. रुपयाने सोमवारीही १७ पैशांची घसरण नोंदविली होती. त्यातून तो ५५ च्या खाली गेला होता. सोमवारी ५५.२३ वर स्थिरावणारा रुपया आज आणखी एक टक्क्यांनी घसरला. विदेशी चलन व्यवहारात दिवसअखेर सावरून मात्र तो २४ पैशांनी वधारत ५४.९८ या पातळीवर विसावला. यामुळे गेल्या सलग चार सत्रातील घसरणही त्याने रोखून धरली. २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०१२ दरम्यान रुपया ५४.०४ ते ५५.८९ या पातळीवर घसरत आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा