अमेरिकेची मध्यवर्ती बँक अर्थात फेडरल रिझव्र्हचे अध्यक्ष बेन बर्नान्के यांचे अमेरिकी संसदेपुढील निवेदन (गुरुवारी पहाटे- भारतीय वेळेनुसार) आणि अमेरिकी अर्थव्यवस्था सावरत असल्याचा संकेत ठरणारे इंटेल कॉर्प आणि बँक ऑफ अमेरिका या तेथील बडय़ा कंपन्यांच्या तिमाही निकाल कसे येतील, याबद्दलच्या साशंकतेपायी देशांतर्गत विविध क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीच्या मर्यादेत वाढीच्या निर्णयानंतरही भांडवली बाजारात उत्साहमिश्रित सावधगिरी बुधवारी दिसून आली. हिंदुस्तान लीव्हर आणि आयटीसी या ग्राहकोपयोगी कंपन्यांच्या दमदार उसळीपायी सेन्सेक्स ९७ अंशांनी वधारून दिवसअखेर १९,९४८.७३ वर स्थिरावला.
जगभरात सर्वच प्रमुख भांडवली बाजारात ‘बिग-बेन धक्क्या’चे आज सावट दिसून आले. अमेरिकी अर्थव्यवस्थेला वेग देणाऱ्या सरकारी रोखे खरेदीच्या नियमित कार्यक्रमाला वर्षअखेर टप्प्याटप्प्याने खंड पाडला जाईल, अशा यापूर्वी २१ मे २०१३ रोजी बेन बर्नान्के यांनी केलेल्या वक्तव्याने भारतासह जगभरच्या महत्त्वाच्या भांडवली बाजारात घसरणीचा थरकाप उडवून दिला होता. परिणामी त्यानंतरच्या काही आठवडय़ात पाच अब्ज डॉलरची गुंतवणूक विदेशी वित्तसंस्थांना भारताच्या रोखे बाजारातून काढून घेतली आहे. त्यामुळे गुरुवारी बर्नान्के अमेरिकी संसदेपुढे करीत असलेल्या मध्य-वार्षिक निवेदनात काय बोलतात, याबाबत गुंतवणूकदार वर्गात भीतीयुक्त उत्सुकता पुन्हा जागी झाल्याचे आज दिसून आले.
तथापि, मंगळवारी सायंकाळी केंद्र सरकारने संरक्षण, दूरसंचार, विम्यासह अनेक महत्त्वाच्या क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीची मर्यादा उंचावण्याचा धाडसी निर्णय घेतल्याच्या परिणामी शेअर बाजाराने आज १५० अंशांच्या उसळीने सुरूवात केली. तथापि मध्यान्हीपर्यंत खुल्या झालेल्या युरोपीय बाजारातील नकारात्मकता पाहता प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स कालच्या तुलनेत घसरून १९,७७८ या दिवसातील नीचांकाला पोहचला.
विदेशी गुंतवणूक मर्यादेत शिथिलतेच्या सरकारच्या निर्णयाने दिवसाच्या पूर्वाधात मोठय़ा मागणीने साडेचार टक्क्यांपर्यंत भावात लक्षणीय वाढ साधणाऱ्या दूरसंचार क्षेत्रातील समभागांना, उत्तरार्धात नफावसुलीमुळे घसरणीचा धक्का सोसावा लागला. रु. १६३ पर्यंत वधारलेल्या आयडिया सेल्युलर तर वार्षिक उच्चांक गाठणाऱ्या रिलायन्स कम्युनिकेशन्सचा भाव दिवसअखेर अनुक्रमे ४.२६ टक्के आणि २.०६ टक्के नुकसानीसह स्थिरावला. भारती एअरटेललाही कालच्या तुलनेत १.६८ टक्क्यांचे नुकसानीचा धक्का बसला.
बरोबरीने रुपयाच्या समर्थनार्थ रिझव्र्ह बँकेने योजलेल्या उपायांमुळे बँका, वाहन तसेच बांधकाम कंपन्या या व्याजदराबाबत संवेदनशील असलेल्या उद्योगक्षेत्रातील समभागांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी नरमाई दिसून आली. प्रमुख उत्पादनांच्या विक्री किमतीत  १५ टक्क्यांपर्यंत वाढीचा निर्णय घेणाऱ्या हिंदुस्तान युनिलीव्हरच्या समभागात ९.८६ टक्क्यांची तर याच क्षेत्रातील आयटीसीच्या समभागातील २.२८ टक्क्यांच्या वाढीने सेन्सेक्सच्या वाढीसाठी मुख्यत्वे हातभार लावला.

Story img Loader