देशातील उद्योगपती, अर्थतज्ज्ञ यांची पंतप्रधानांनी बैठक बोलावताच गुंतवणूकदारांनी एकूण अर्थव्यवस्थेवरील विश्वास मंगळवारी भांडवली बाजाराच्या तेजीच्या व्यवहारावरून व्यक्त केला. एकाच व्यवहारातील तब्बल ४२४ अंश वाढ नोंदवीत सेन्सेक्स २५ हजारांचा टप्पा पार करतानाच त्याने गेल्या १५ महिन्यांच्या तळातूनही उसंत घेतली. तर १२९ अंश वाढीने निफ्टीने १२९ अंश वाढीने त्याचा ७,५०० पुढील स्तर पुन्हा मिळविला.
४२४.०६ अंश वाढीसह मुंबई निर्देशांक २५,३१७.८७ पर्यंत पोहोचला. तर निफ्टीत १२९.४५ अंश भर पडून राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक ७,६८८.२५ वर स्थिरावला.
परकी चलन व्यासपीठावर रुपया भक्कम होत असल्याचे स्वागतही बाजारात झाले. त्याचबरोबर रिझव्‍‌र्ह बँकेमार्फत आधार दराबाबत दुरुस्तीची सकारात्मक अपेक्षाही व्यक्त झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत बोलाविलेल्या बैठकीला मुकेश अंबानी, कुमारमंगलम बिर्ला आदींसह अनेक उद्योगपती तसेच विविध अर्थतज्ज्ञ, बँक प्रतिनिधी उपस्थित होते. उद्योजकांनी या वेळी रिझव्‍‌र्ह बँकेने व्याजदर कमी करण्याची मागणी केली तर पंतप्रधानांनी उद्योजकांना गुंतवणूक वाढविण्याचे आवाहन केले.
सेन्सेक्सच्या मंगळवारच्या व्यवहाराची सुरुवातच शतकी निर्देशांक वाढीने झाली. याच वेळी त्याने २५ हजारांचा टप्पा गाठला. भारतीय अर्थव्यवस्थेतील प्रगतीविषयक हालचालींबरोबरच चीनच्या भांडवली बाजारातील तेजीनेही बाजाराला साथ दिली. त्यामुळे व्यवहारात सेन्सेक्स २५,४११ पर्यंत उंचावला.
चिंताजनक चिनी अर्थव्यवस्थेमुळे सेन्सेक्सने गेल्या दोन व्यवहारांत ८७०.९७ अंश आपटी नोंदविली होती. सोमवारी २५ हजारांखाली जाताना त्याने गेल्या १५ महिन्यांतील तळ नोंदविला होता. मंगळवारी चीनमधील शांघाय कंपोजिट २.९२ तर हँग सँग ३.२८ टक्क्यांनी वाढले होते.
सेन्सेक्समध्ये गेल सर्वाधिक – ६.४८ टक्क्यांनी वाढला. तर टाटा स्टील, भेल, अ‍ॅक्सिस बँक यांचेही समभाग मूल्य वाढले. मुंबई निर्देशांकातील चार समभाग घसरणीच्या यादीत राहिले.
क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये बँकेक्स तब्बल ३.६१ टक्क्यांनी वाढला. पाठोपाठ भांडवली वस्तू, ऊर्जा, स्थावर मालमत्ता, पोलाद क्षेत्रातील समभागांनाही मागणी राहिली. मिड व स्मॉल कॅप निर्देशांक अनुक्रमे १.०२ व ०.६० टक्क्यांनी वाढले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रुपयाचे डोकेही दोन वर्षांच्या तळातून वर!
भांडवली बाजाराप्रमाणे चलन बाजारातही मंगळवारी रुपयाने दमदार उसळी घेतली. डॉलरच्या तुलनेत रुपया आठवडय़ाच्या दुसऱ्या सत्रात २७ पैशांनी भक्कम होत ६६.५५ पर्यंत उंचावला. ०.४० टक्के वाढीसह तो गेल्या दोन वर्षांच्या तळातूनही बाहेर आला. मंगळवारच्या सत्राची सुरुवात ६६.७७ अशी तेजीसह करणारा रुपया व्यवहारात ६६.५३ पर्यंत झेपावला. तर त्याचा सत्रातील तळ ६६.७९ राहिला. सोमवारी ६६.८२ या दोन वर्षांपूर्वीच्या किमान स्तरावर तो पोहोचला होता. गेल्या तीन व्यवहारांतील त्याची आपटी ६३ पैशांची राहिली आहे.