केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार सत्तास्थापनेची ‘शंभरी’ होत असतानाच चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीतील वाढत्या सकल राष्ट्रीय उत्पादनापाठोपाठ चालू खात्यातील तूटही सावरल्याचे गुंतवणूकदारांनी उत्स्फूर्त स्वागत केले. सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी नोंद करण्यास भाग पाडणाऱ्या भांडवली बाजारातील सेन्सेक्स यामुळे मंगळवारी २७ हजार पार झाला तर निफ्टीने ८,१०० नजीक जाणे पसंत केले.
शेअर बाजार अस्तित्वात आल्यापासून प्रथमच २७ हजारांचा आकडा पार करणाऱ्या सेन्सेक्सने व्यवहारात २७,०८२.८५ पर्यंत मजल मारली. तर दिवसअखेर तो २७,०१९.३९ या सर्वोच्च स्तरावर विसावला. सोमवारच्या तुलनेत मुंबई निर्देशांकांमध्ये १५१.८४ अंश भर पडली. तर सलग आठव्या व्यवहारात तेजी नोंदविणारा राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी मंगळवारी प्रथमच ८,१०० पार झाला. व्यवहारअखेर त्यात ५५.३५ अंश वाढ होऊन निर्देशांक ८,०८३.०५ वर पोहोचला. उल्लेखनीय म्हणजे मिड व स्मॉल कॅपही अनुक्रमे ०.८४ व ०.९१ टक्के वाढ नोंदविते झाले.
२०१४-१५ च्या एप्रिल ते जून या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादनाने ५.७ टक्के वाढ नोंदविली आहे. तर देशाने चालू खात्यातील तूटही सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या १.७ टक्के अशी राखली आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत ही तूट ४.८ टक्के होती. भाजपप्रणीत आघाडी सरकारच्या स्थापनेच्या कालावधीत हे सारे घडून आल्याची भावना गुंतवणूकदारांची झाली असून गेल्या दोन दिवसांपासून त्याची प्रतिक्रिया भांडवली बाजारातही उमटत आहे. सोमवारीही सेन्सेक्स २६,९०० च्या विक्रमावर पोहोचला होता, तर निफ्टीने इतिहासात प्रथमच ८,००० चा पल्ला ओलांडला होता. सलग दुसऱ्या दिवशी निर्देशांकाची शिखर सर कायम राहिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा