सेन्सेक्सची पाचव्या सत्रात ७२ अंश भर
निर्देशांक सात महिन्यांच्या वरच्या टप्प्यावर
सलग पाचव्या व्यवहारात तेजी नोंदविताना मुंबई शेअर बाजाराने नव्या आठवडय़ाची सुरुवात निर्देशांक वाढीसह केली. ७२ अंश वाढीसह २६,७२५.६० वर जाताना सेन्सेक्स सोमवारी त्याच्या गेल्या सात महिन्यांच्या वरच्या टप्प्यावर विराजमान झाला. तर सत्रात ८,२०० चा स्तर गाठणारा राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर २१.८५ अंश वाढीमुळे ८,१७८.५० वर राहिला.
आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी बंद झालेला मुंबई निर्देशांकाचा टप्पा यापूर्वीच्या २९ ऑक्टोबर २०१५ नंतरचा वरचा टप्पा राहिला. सेन्सेक्स गेल्या आठवडय़ात १,३५२ अंशांनी तर निफ्टी या कालावधीत ४०७ अंशांनी झेपावला आहे. परिणामी प्रमुख निर्देशांकांनी मार्चनंतरची सर्वात चांगली सप्ताह कामगिरी बजाविली आहे.
अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हच्या प्रमुखांनी व्याजदर वाढीचे संकेत देऊनही भारतातील कंपन्यांच्या फायद्यातील तिमाही निष्कर्षांची बाजाराला आशा आहे. परिणामी विदेशी गुंतवणूकदार संस्थांचा निधी ओघ पुन्हा एकदा बाजारात येताना दिसत असून प्रमुख निर्देशांक वधारले आहेत. यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याच्या आशेनेही गुंतवणूकदारांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. आशियाई तसेच युरोपीय बाजारांची नव्या सप्ताहाच्या तेजीची वाढही येथील बाजाराच्या जोडीला आहेच. सेन्सेक्स सोमवारी २६,५०० च्या खूप पुढे राहिला. तर निफ्टीने दिवसअखेरही ८,२०० नजीकचा स्तर राखला. नव्या आठवडय़ाची सुरुवात करताना पहिल्या तासातच निफ्टीने हा अनोखा टप्पा गाठला.
सेन्सेक्समध्ये टाटा समूहातील टाटा मोटर्सच्या समभागाचे मूल्य सर्वाधिक (+४.२३%) वाढले. पाठोपाठ कोल इंडिया (३.८०%), हीरो मोटोकॉर्प, टीसीएस, एनटीपीसी, डॉ. रेड्डीज, आयटीसी, बजाज ऑटो (सारे ३ टक्क्य़ांच्या वर) यांचे मूल्य उंचावले. तर नफा घसरणीने भेलचा समभाग ५.८१ टक्क्य़ांनी आपटला. सेन्सेक्समधील १७ समभागांचे मूल्य वाढले. तर क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये पोलाद विभागाची कामगिरी सर्वाधिक, २.२८ टक्क्य़ांनी उत्तम राहिली. माहिती तंत्रज्ञान, वाहन आदी क्षेत्रीय निर्देशांकांतही वाढ नोंदली गेली.
रुपया सप्ताह उंचीवरून मागे
डॉलरच्या तुलनेत आठवडय़ाच्या वरच्या टप्प्यावर असलेला रुपया सोमवारी मात्र या स्तरापासून ढळला. सोमवारच्या १३ पैशांच्या घसरणीने स्थानिक चलन ६७.१६ वर स्थिरावले. रुपयाचा आठवडय़ातील पहिल्या दिवशीचा सत्रतळ ६७.३७ राहिला.

Story img Loader