गुरुवारपासून सुरू होणारे संसदेचे हिवाळी अधिवेशन आर्थिक सुधारणांना गती देणारे असेल, या आशादायक वातावरणात भांडवली बाजारात आज अनेक सत्रांनंतर खरेदीचे वातावरण निर्माण झाले. परिणामी, १३१.०६ अंश वाढीसह सेन्सेक्स १८,४६०.३८ पर्यंत पोहोचला. तर निफ्टीही ४३.२५ अंश वधारणेनंतर ५,६१४.८० वर गेला.
मुंबई शेअर बाजार गेल्या तब्बल दोन आठवडय़ांपासून संथ वाटचाल करीत आहे. आजच्या एकाच सत्रातील वाढीमुळे सेन्सेक्स अनेक दिवसांनंतर १८,४०० तर निफ्टी ५,६०० च्या पुढे जाऊ शकला. जवळपास दीड टक्क्याच्या वाढीने मार्गक्रमण करणाऱ्या प्रमुख आशियाई बाजारांचीही साथ निर्देशांक वाढीला आज मिळाली.
बँक, निवृत्तीवेतन, विमा आदी वित्त क्षेत्राशी संबंधित अनेक विधेयके नवी दिल्लीत उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशना दरम्यान मांडली जाणार आहेत. यामुळे अर्थव्यवस्थेतील मरगळ झटकल्याची आशा निर्माण झाल्याने गुंतवणूकदारांनी बुधवारी मुंबई शेअर बाजारात निवडक समभागांची खरेदी केली. यामध्ये बांधकाम, विद्युत उपकरण, बँक आदी क्षेत्रातील समभागांचे मूल्य वधारले. बहुप्रतिक्षित संभाव्य बँकिंग सुधारणा विधेयकामुळे आयसीआयसीआय, एचडीएफसी या खाजगी बँकांनाही मागणी राहिली. ऊर्जा, पोलाद, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांच्याही साथीने सेन्सेक्समधील प्रमुख ३० पैकी १९ समभाग वधारत्या यादीत नोंदले गेले.