भांडवली बाजारातील घसरण सलग सहाव्या दिवशीही कायम मंगळवारीही राहिली. चढय़ा किरकोळ व घाऊक महागाई दरामुळे बुधवारच्या मध्य तिमाही पतधोरणात रिझव्‍‌र्ह बँकेमार्फत होणारी संभाव्य व्याजदर वाढीचे सावट शेअर बाजारावर स्पष्टपणे दिसले. सेन्सेक्स ४७.३८ अंशाने २०,६१२.१४ पर्यंत घसरला. तर निफ्टी १५.६५ अंश आपटीसह ६,१३९.०५ पर्यंत खाली आला.
व्यवहारात सप्ताहारंभाच्या तुलनेत १२५ अंशांनी उंचावणारा सेन्सेक्स आठवडय़ाच्या दुसऱ्या दिवशीच्या सत्रादरम्यान २०,७८४.०३ पर्यंत गेला होता. मात्र दिवसअखेर व्याजदराशी निगडित बँक, बांधकाम आदी क्षेत्रांतील समभागांची विक्री होऊन सेन्सेक्स नकारात्मक स्थितीत आला. या सहाही सत्रात मिळून सेन्सेक्सने ७१४ अंशांची घसरण नोंदविली आहे. तो आता आठवडय़ाच्या नीचांकाला येऊन ठेपला आहे.
रुपया पुन्हा नरमला
सप्ताहारंभी ३९ पैशांनी भक्कम होणारे भारतीय चलन मंगळवारी पुन्हा नरमले. डॉलरच्या तुलनेच रुपया व्यवहाराअखेर २८ पैशांनी रोडावत ६२.०१ पर्यंत घसरले. रिझव्‍‌र्ह बँकेचे मध्य तिमाही पतधोरण एक दिवसावर आले असताना आणि अमेरिकन फेडरल रिझव्‍‌र्हची रोखे खरेदीची बैठक सुरू झाली असतानाच रुपयावर दबाव निर्माण झाला आहे. मंगळवारच्या सत्रात ६१.७५ पर्यंत उंचावरणारा रुपया दिवसभरात ६१.०३ पर्यंत घसरला.

Story img Loader