नवी दिल्ली : महागाईमुळे सर्वच क्षेत्रात अस्वस्थता दिसून येत असली तरी मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या सेवा क्षेत्रातील कामगिरीने सुखद अनुभूती दिली. देशातील सेवा क्षेत्राने सरलेल्या जून महिन्यात गेल्या ११ वर्षांतील उच्चांकी पातळी गाठणारी सक्रिया साधली आहे.
भारतातील सेवा व्यवसायातील खरेदी व्यवस्थापकांचा कल दर्शविणाऱ्या ‘एस अॅण्ड पी ग्लोबल इंडिया सव्र्हिसेस पीएमआय’ निर्देशांक जून महिन्यात ५९.२ गुणांवर नोंदला गेला. या निर्देशांकाने नोंदविलेली एप्रिल २०११ नंतरची म्हणजेच मागील ११ वर्षांतील उच्चांकी पातळी आहे. मे २०२२ मध्ये हा निर्देशांक ५८.९ गुणांवर होता. मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या या अहवालानुसार, महागाईचा पारा वाढता असला तरी, नव्याने आलेला कामांचा ओघ व मागणीपूरक अनुकूलता एकंदर सेवा क्षेत्राच्या पथ्यावर पडली आहे.
सलग अकराव्या महिन्यात सेवा क्षेत्राची दमदार वाटचाल कायम आहे. पीएमआय निर्देशांक ५० गुणांच्या वर राहिल्यास अर्थव्यवहारातील विस्तार दर्शविला जातो, तर ५० च्या खालील गुणांक आकुंचनाचे निदर्शक मानले जाते.
नवीन कार्यादेशांमध्ये फेब्रुवारी २०११ नंतर दिसून आलेली सर्वाधिक जलद वाढ सरलेल्या महिन्यात नोंदविली गेली आहे. नुकत्याच सरलेल्या एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत झालेल्या आर्थिक विस्तारामुळे सेवा क्षेत्राला अधिक बळ मिळाले आहे. तसेच नवीन व्यवसायांच्या वाढीमुळे मागणी आणि उत्पादनात जलद वाढ झाल्याने सेवा क्षेत्राचा पुढील महिन्यात आणखी लक्षणीय वाढीच्या दिशेने प्रवास सुरू राहण्याची आशा ‘एस अॅण्ड पी ग्लोबल इंडिया’च्या अर्थतज्ज्ञ पॉलियाना डी लिमा यांनी व्यक्त केली.
करोनाची ओसरलेली लाट, उद्योग क्षेत्राचा क्षमता विस्तार आणि अनुकूल आर्थिक वातावरणामुळे सेवा व्यवसाय वेगाने पूर्वपदावर आले आणि त्यांच्या मागणीत निरंतर वाढ होत असल्याने सेवा क्षेत्राच्या विस्ताराला अतिरिक्त गती मिळाली आहे. जुलै २०१७ नंतर सेवांच्या किमतींमध्येही सर्वात जलद वाढ दर्शविली गेली आहे.
मात्र अनेक कंपन्यांनी त्यांच्या अतिरिक्त खर्चाचा काही हिस्सा ग्राहकांच्या खांद्यावर हस्तांतरित केला आहे. सेवा क्षेत्रातील महागाई दर पाच महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. मात्र देशांतर्गत व्यवसायांसाठी नवीन कार्यादेश व मागणीतील वाढीमुळे सेवा क्षेत्राने उच्चांकी वाढ नोंदवली आहे, असेही पॉलियाना डी लिमा यांनी सांगितले.
रोजगाराच्या आघाडीवर..
नवीन कार्यादेश आणि मागणी वाढल्याने जून महिन्यात कंपन्यांनी अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करून मागणी पूर्ण करण्यास प्राधान्य दिले आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ झाली नसली तरी मे महिन्यात रोजगारात घसरण झाली होती. त्या तुलनेत सरलेल्या जून महिन्यात रोजगारात किरकोळ वाढ झाली आहे.