नवी दिल्ली : नवीन व्यवसायातून मजबूत नफा, मागणीच्या परिस्थितीत सतत होत असलेली सुधारणा आणि रोजगार निर्मितीच्या आघाडीवर सुधारलेले चित्र या परिणामी भारताच्या सेवा क्षेत्राच्या सक्रियतेत सरलेल्या ऑगस्टमध्ये मोठी वाढ दिसून आली, असे मासिक सर्वेक्षणातून सोमवारी पुढे आले. सलग तेराव्या महिन्यात सेवा क्षेत्राने सकारात्मक वाढीचा प्रत्यय दिला आहे.

हंगामी आधारावर समायोजित ‘एस अँड पी ग्लोबल इंडिया सव्‍‌र्हिसेस पीएमआय निर्देशांक’ ऑगस्टमध्ये ५७.२ गुणांवर नोंदवण्यात आला. जुलैमधील चार महिन्यांच्या नीचांकी ५५.५ गुणांच्या तुलनेत ही लक्षणीय वाढ आहे.

सेवा क्षेत्रातील व्यावसायिक क्रियाकलापांमध्ये वेगवान वाढ आणि रोजगारामध्ये १४ वर्षांपेक्षा जास्त काळात दिसून आलेली तीव्र वाढ हे घटक यास कारणीभूत ठरले आहेत. सेवा व्यवसायातील खरेदी व्यवस्थापकांमध्ये केलेल्या जाणाऱ्या सर्वेक्षणावर आधारित हा निर्देशांक ५० गुणांच्या वर विस्तारदर्शक, तर ५० पेक्षा कमी नोंदविला गेल्यास आकुंचन दर्शवितो.

करोना प्रतिबंधक निर्बंध उठविले गेल्याचा आणि त्या पश्चात सुरू असलेल्या विपणन प्रयत्नांचा फायदा कंपन्यांना होत राहिल्याने नवीन व्यवसायात आणि त्यापोटी मिळकतीतही वाढ झाली, असे एस अँड पी ग्लोबल मार्केट इंटेलिजन्सच्या अर्थतज्ज्ञ पोल्याना डी लिमा यांनी सांगितले. सेवा क्षेत्रात मे २०१८ नंतरच्या सर्वाधिक आशावादासह आगामी वर्षभराच्या कालावधीतील विस्तारासंबंधीचे अंदाज सुधारून उंचावले गेले आहेत, असे निरीक्षणही त्यांनी नोंदवले.

दरम्यान, एस अँड पी ग्लोबल इंडियाचा सेवा आणि निर्मिती क्षेत्रातील उत्पादनाची स्थिती जोखणारा एकत्रित ‘पीएमआय निर्देशांक’ सरलेल्या ऑगस्टमध्ये ५६.८ वरून ५८.२ गुणांपर्यंत वाढला आहे, जो अर्थव्यवस्थेतील या दोन्ही घटकांमधील विस्ताराची तीव्र गती दर्शवितो. निर्मिती आणि सेवा अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये नवीन कामांची भर जलद गतीने पडत असून, ज्यामुळे नऊ महिन्यांतील संयुक्त स्तरावर सर्वात वेगवान वाढ नोंदवली गेली आहे.

रोजगारनिर्मितीत १४ वर्षांनंतर बहार

सेवा क्षेत्रातील कंपन्यांमध्ये दिसून आलेली आगामी १२ महिन्यांतील व्यवसाय वाढीची भावना ही चार वर्षांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचल्याचे दिसत आहे. मागणी आणि नियोजित बाजारवर्गात सुरू असलेल्या सुधारणांच्या अंदाजांवर त्यांचा हा आशावाद केंद्रित आहे. भक्कम विक्री आणि उत्साहवर्धक वाढीच्या अंदाजांच्या परिणामी रोजगाराच्या आघाडीवर कधी नव्हते इतकी बहारदार स्थिती आहे. नोकऱ्यांच्या निर्मितीचा दर १४ वर्षांतील सर्वात मजबूत पातळीवर आहे. निरीक्षण केलेल्या चार उप-क्षेत्रांपैकी प्रत्येकामध्ये रोजगाराचा कल सुधारला आहे. भारताच्या खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांनी दुसऱ्या तिमाहीच्या मध्यावर १४  वर्षांपेक्षा जास्त काळात नोंदविलेली मोठी वाढ असल्याचे सर्वेक्षणाने नमूद केले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे संपूर्ण सेवा आणि निर्मिती क्षेत्रामध्ये नवीन नोकऱ्यांच्या वेतनमानाच्या आकडय़ांतही भरीव वाढ दिसत आहे.

Story img Loader