बारा घरच्या बारा जणी अशी एक म्हण आहे! त्याचप्रमाणे सात घरांकडून विचारले गेलेले सात प्रश्नांची उत्तरे या स्तंभात सविस्तर देत आहे. मात्र हे प्रश्न सात घरांतून विचारले गेले नाहीत तर अंधेरी येथून श्रीहरी श्रीपाद सातघर या वाचकांनी विचारले आहेत. सातघर हे गेली ४८ वष्रे नेमाने ‘लोकसत्ता’ वाचतात. त्यांच्या या सात प्रश्नांची उत्तरे कुणी समाधानकारक देऊ शकत नाही ही त्यांची तक्रार आता दूर होईल असे वाटते. ब्रोकरेज, खात्यातील शेअर्सचे हस्तांतरण वगरे अनेक बाबी त्यात समाविष्ट आहेत. कमीत कमी ब्रोकरेज कोण घेतो हा सातघर यांचा मुख्य प्रश्न.
जो दलाल स्टॉक एक्स्चेंजवर अधिकृतपणे नोंदणी केलेला असेल तर तो सुरक्षितच असतो. कारण तिथे येण्याच्या आधी त्याला ‘सेबी’कडून नोंदणीचे प्रमाणपत्र घ्यावे लागते. त्यामुळे करोडो रुपयांचे व्यवहार करणारा दलाल सुरक्षित आणि लाख रुपयांचे थोडेसे व्यवहार करणारा उपदलाल धोक्याचा असे काही नाही. दलाल छोटा असो की मोठा, दोघांच्याबरोबर आपण केलेल्या व्यवहारांना स्टॉक एक्स्चेंजचे पाठबळ असते. दुर्दैवाने दलाल दिवाळखोरीत गेला तर बीएसईकडे कोटय़वधी रुपयांचा ‘ट्रेड गॅरंटी फंड’ आहे ज्यामुळे आíथक पेचप्रसंग उद्भवणार नाही. तसेच दलाल बुडीत गेल्यास गुंतवणूकदाराला १५ लाख रुपये संरक्षण असते. कोणताही ब्रोकर अडीच टक्के जास्तीत जास्त ब्रोकरेज घेऊ शकतो. मात्र प्रत्यक्षात त्याहूनही किती तरी कमी ब्रोकरेज घेतले जाते, कारण या क्षेत्रातील स्पर्धा! कमी ब्रोकरेज असलेले दलाल शोधण्यात अनेक मंडळी आपला वेळ खर्च करतात. पण व्यावहारिक विचार केला तर ही पायपीट अनाठायी ठरते. उदाहरणार्थ, मी १० हजार रुपयांचे शेअर्स घेतले. १० पसे दलाली म्हणजे १०० रुपयाला १० पसे म्हणजे ०.१ टक्के दर झाला दलालीचा! या दराने ब्रोकरेज होते १० रुपये. समजा दुसरा दलाल पाच पसे दराने ब्रोकरेज लावीत असेल तर ब्रोकरेज होते पाच रुपये. मग मी त्या दुसऱ्या ब्रोकरच्या मागे धावण्यात अर्थ नाही अशासाठी की प्रत्यक्षात बहुतांशी दलाल मंडळी किमान ब्रोकरेज लावणार जे २० रुपये किंवा २५ रुपये असू शकते! म्हणजे दोघांपकी कुणीही निवडला तरी तो २५ रुपयेच घेणार. हा फरक कुणाला पडेल तर जी व्यक्ती करोडो रुपयांचे व्यवहार करीत असेल तिला. इतका सरळ साधा विचार अनेक जण करीत नाहीत. बहुसंख्य दलाल किमान दलाली २० ते २५ रुपये आकारतातच, कारण शंभर रुपयांचे शेअर्स तुम्ही खरेदी केलेत तर दहा पसे दलालीत त्याचा प्रपंच चालणार कसा?
आपण बहुतांशी गुंतवणूकदार हे लहान गटात मोडणारे असल्याने हे पाच पसे, सात पसे याने आपल्याला फरक पडत नाही. अनेक दलाल ‘झीरो ब्रोकरेज’ असे सांगतात त्याचे काय, असा प्रश्न त्यांना पडला आहे. १,९४७ रुपये एका महिन्याला ठोस रक्कम दलाली म्हणून दलालाला दिले तर तो याहून जास्त एक रुपया दलाली आकारणार नाही, अगदी १० कोटी रुपयांचे व्यवहार केलेत तरीही. आता गणित करायचे तर एक कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले किंवा विकले तर दहा पसे दराने ब्रोकरेजची रक्कम होणार असते १० हजार रुपये. ते १० हजार न देता १,९४७ रुपयांत काम झाले की! तरीदेखील काही दलाल (फारच थोडे) जितकी दलालीची रक्कम होईल, उदाहरणार्थ तीन रुपये ६० पसे झाले असतील तर केवळ तितकीच दलाली घेतात. आता त्यांना हे कसे परवडते याला उत्तर आहे वरील १,९४७ रुपये योजनेत. अनेक मोठे गुंतवणूकदार त्या दलालाकडे व्यवहार करीत असतात, त्यामुळे छोटय़ा गुंतवणूकदारांना ही सवलत देणे त्याला परवडते. घरात लग्न कार्यासारखे मोठे समारंभ झाले की त्यातच आपण सत्यनारायणाची पूजा उरकून घेतो, कारण त्यासाठी वेगळा असा काही खर्च येत नाही, त्यातलाच हा प्रकार!  कुणी विचारील की असे तीन रुपये ६० पसे वगरे घेणारे दलाल आम्हाला कुठे भेटतील. संबंधितांच्या वेबसाइटवर हा सर्व तपशील दिलेला असतो.
सातघर यांचे आयसीआयसीआय बँकेत एनएसडीएल खाते ते त्यांना बँक ऑफ इंडियाकडील सीडीएसएलमध्ये बदलून घ्यायचे आहे. दोन्ही ठिकाणी खाती सुरू ठेवता येतात का, असेही ते विचारतात. दोन्ही ठिकाणी खाती सुरू ठेवू शकता. अर्थात दोन खात्यांचे वार्षकि चार्ज भरावे लागतील हे उघड आहे. तथापि, सोय म्हणून तुम्ही एका डीपीकडील सर्व शेअर्स दुसऱ्या डीपीकडे विनामूल्य हस्तांतरित करून पहिले डिमॅट खाते बंद करू शकता. पहिल्या ठिकाणी ट्रेिडग खात्यात जो काही हिशेब बाकी असेल तो चुकता करा म्हणजे झाले. मात्र आयसीआयसीआयकडे ट्रेिडग खाते आणि बँक ऑफ इंडियाकडे डिमॅट अशी व्यवस्था ‘थ्री इन वन’ प्रणालीत चालणार नाही. लातूर या त्यांच्या गावी कार्यक्रम कराल का, असेही ते विचारतात. महाराष्ट्रात कुठेही जाऊन विनामूल्य कार्यक्रम करायला मला केव्हाही आवडेल. मात्र लातूर किंवा अन्य कुठेही कुणीतरी स्थानिक माणूस पुढाकार घ्यायला हवा. लातूरच्या शासकीय किंवा अनुदानित वाचनालयाचा संपर्क क्रमांक मला आपण द्यावा म्हणजे पुढील व्यवस्था करता येईल. महाराष्ट्र सरकारच्या ग्रंथसंचालनालयाच्या सूचनेनुसार अनेक वाचनालयांनी माझ्या विनामूल्य व्याख्यानांचे आयोजन करायला सुरुवात केली आहेच.
मनाली नाईक यांची आई आणि भाऊ असे संयुक्त खाते आहे. आईच्या पश्चात ते शेअर्स मनाली यांना मिळावेत अशी इच्छा आहे. इच्छापत्र करून तसे करता येईल का, असे त्या विचारतात. तसेच अन्य काही सोपा मार्ग सुचवा, अशी त्यानी विनंती केली आहे. संयुक्त खात्यात एक खातेदार निधन पावला तर जिवंत असलेल्या सहखातेदाराला ते शेअर्स मिळणार. इच्छापत्र इथे लागू होत नाही. सोपा मार्ग म्हणजे आई आणि मनाली यांनी संयुक्त डिमॅट खाते उघडून त्यात सर्व शेअर्स हस्तांतरित करून घ्यावेत आणि आई-भाऊ यांचे खाते बंद करावे. शेअर कुठल्याही खात्यातून कुठल्याही खात्यात हस्तांतरित करता येतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा