दोलायमान स्थितीत राहूनही अधिक प्रमाणात तेजी नोंदविणाऱ्या भांडवली बाजाराने सप्ताहअखेर ती मागे टाकली. सलग दुसऱ्या दिवशी घसरण नोंदविताना मुंबई निर्देशांकाने तिचा विस्तार केला. २५८.५३ अंश घसरणीसह सेन्सेक्स २८,५०० पासून लांब जाताना थेट २८,११२.३१ वर येऊन ठेपला. निर्देशांकाचा हा पंधरवडय़ाचा तळ आहे. शुक्रवारच्या सत्रात निफ्टी ६८.२५ अंशांनी घसरून ८,५२१.५५ वर स्थिरावला.
आठवडय़ाभरात राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने ९० अंशांचे नुकसान सोसले आहे. तर सेन्सेक्समधील दोन व्यवहारातील घसरणीचा आकडा ३९२.६२ अंश नोंदला गेला आहे. साप्ताहिक तुलनेत सेन्सेक्स ३५१ व निफ्टी ८८.३० अंशांनी घसरला आहे. हे नुकसान प्रत्येकी सव्वा टक्क्य़ापेक्षाही अधिक आहे.
बाजारात शुक्रवारी परकी चलन व्यासपीठावर रुपयाने डॉलरच्या तुलनेत ६४ चा फेर धरल्याची चिंता अधिक उमटली. सायंकाळी उशिरा जाहीर होणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या तिमाहीत वित्तीय निष्कर्षांची वाट पाहत गुंतवणूकदारांनी समभाग विक्रीचा सपाचा सप्ताहअखेरच्या व्यवहारात लावला.
मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकात जवळपास एक टक्क्य़ाची घसरण झाली. मुंबई शेअर बाजारातील दोन वगळता इतर दहाही क्षेत्रीय निर्देशांक घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्समधील घसरणीत आयसीआयसीआय बँक समभाग आघाडीवर राहिला. त्याचबरोबर विप्रोच्या समभाग मूल्यातही तेवढीच, ३.७० टक्क्य़ांहून अधिक आपटी नोंदली गेली.
मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांकातही अध्या टक्क्य़ाहून अधिक घसरण सप्ताहअखेर नोंदली गेली. सेन्सेक्समधील २१ समभागांचे मूल्य रोडावले.
ल्युपिन, टाटा मोटर्स, गेल, स्टेट बँक, वेदांता, महिंद्र अॅन्ड महिंद्र, टाटा स्टील, भेल, लार्सन अॅन्ड टुब्रो, कोल इंडिया, इन्फोसिस, अॅक्सिस बँक, मारुती सुझुकी, आयटीसी, डॉ. रेड्डीज, ओएनजीसी असे सारे आघाडीचे समभाग दिवसअखेर घसरले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये १.५७ टक्क्य़ांसह भांडवली वस्तू निर्देशांकाला घसरणीचा सर्वाधिक फटका बसला.
नव्या आठवडय़ात बाजारात महिन्यातील वायदापूर्तीच्या अखेरच्या दिवसाचे व्यवहार होणार आहेत. तेव्हा नफेखोरीसाठी प्रमुख निर्देशांकावर अधिक दबाव येण्याची शक्यता बाजारतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा