गेल्या दोन्ही आठवडय़ात सलग चार सत्रात तेजीत राहणारा सेन्सेक्स २८ हजाराला स्पर्श करण्याच्या अंतरापासून काहीसाच दुरावला. नफेखोरीने अखेर सप्ताहारंभीच मुंबई निर्देशांक किरकोळ घसरणीने अनोख्या टप्प्यापासून माघारी फिरला. तर निफ्टीला सत्रातील अखेरच्या तेजीमुळे मात्र व्यवहारात ८,३५० पर्यंत मजल मारता आली.
गेल्या आठवडय़ात सलग चार व्यवहारात सेन्सेक्स वधारला होता. तत्पूर्वीच्या आठवडय़ातही अशीच कामगिरी मुंबई निर्देशांकाने बजाविली होती. त्यामुळे चार सत्रातील त्याची झेप दोन्हीवेळा १,००० अंशांची राहिली होती.
नव्या आठवडय़ाची सुरुवात करतानाही सेन्सेक्ससह निफ्टी तेजीच्या वाटेवर रुढ झाले होते. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा प्रतिसाद यावेळी समभाग मूल्यांच्या तेजीवर उमटत होता. तसेच स्थावर मालमत्ता, सार्वजनिक बँकांच्या समभागांना असलेल्या मागणीने एकूणच उत्साह होता.
सेन्सेक्सने रांगेत तिसऱ्यांदा सर्वोच्च टप्प्याला गवसणी घातली. सत्रात निर्देशांक २७,९६९.८२ पर्यंत उंचावला. मात्र २८ हजाराचा अनोखा टप्पा गाठण्यात त्याला यश आले नाही. उलट दिवसअखेर त्यात शुक्रवारच्या तुलनेत किरकोळ अशी, ५.४५ अंशांची घसरण नोंदली गेली. मुंबई निर्देशांक २७,८६०.३८ वर स्थिरावला.
निफ्टीने सत्रात ८,३५०.६० या सर्वोच्च स्तराला स्पर्श केल्यानंतर दिवसअखेर अवघ्या १.९५ अंश वाढीसह का होईना मात्र ८,३२४.१५ अशी शुक्रवारच्या तुलनेत सकारात्मक कामगिरी बजाविली. सत्रात मात्र ८,३०० खाली घसरत निफ्टीनेही काहीशी चिंता निर्माण केली होती.
सेन्सेक्समधील ३० पैकी १८ समभाग घसरले. तर १२ समभागांचे मूल्य वधारले. घसरलेल्या समभागांमध्ये प्रामुख्याने गेल, कोल इंडिया, आयटीसी, एनटीपीसी, ओएनजीसी, भेल यांचा समावेश राहिला.
२८ हजार नाहीच!
गेल्या दोन्ही आठवडय़ात सलग चार सत्रात तेजीत राहणारा सेन्सेक्स २८ हजाराला स्पर्श करण्याच्या अंतरापासून काहीसाच दुरावला. नफेखोरीने अखेर सप्ताहारंभीच मुंबई निर्देशांक किरकोळ घसरणीने अनोख्या टप्प्यापासून माघारी फिरला.
First published on: 04-11-2014 at 01:06 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Share market fail to touch 28000 figure