मुंबई : जागतिक बाजारातील अनुकूलतेने सकाळी सकारात्मक खुल्या झालेल्या भांडवली बाजाराने सत्रात ५८ हजार अंशांची महत्त्वपूर्ण पातळी सोडत नकारात्मक पातळीत प्रवेश केला. मात्र अखेरच्या तासात खरेदीचा जोर वाढल्याने पुन्हा एकदा तेजीची वाट धरली. बुधवारच्या या एकंदरीत अस्थिर व्यवहाराची अखेर ‘सेन्सेक्स’ने दिवसाच्या उच्चांकिबदूपाशीच केली.
परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू राहिलेली समभाग खरेदी आणि जागतिक सकारात्मकतेच्या जोरावर सलग सहाव्या सत्रात प्रमुख निर्देशांकाची दौड कायम आहे. बुधवारचे व्यवहार आटोपले तेव्हा सेन्सेक्स २१४.१७ अंशांनी वधारून ५८,३५०.५३ पातळीवर बंद स्थिरावला. दिवसभरात त्याने ५७,७८८.७८ पातळीचा तळ गाठल्यानंतर ५८,४१५.६३ अंशांचा उच्चांकही पहिला. तर निफ्टीमध्ये ४२.७० अंशांची वाढ झाली आणि तो १७,३८८.१५ पातळीवर स्थिरावला.
अमेरिका-चीन दरम्यान निर्माण झालेला तणाव निवळल्याने जागतिक पातळीवर भांडवली बाजारांमध्ये पुन्हा चैतन्य निर्माण झाले आणि त्याचे पडसाद देशांतर्गत भांडवली बाजारावरही उमटले. मात्र अजूनही जागतिक आर्थिक मंदीचे संकट कायम असल्याने गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा अवलंबिल्याचे दिसून आले. तथापि माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे समभाग आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागात गुंतवणूकदारांनी खरेदीचा सपाटा लावल्याने निर्देशांकांना बळ मिळाले.
देशांतर्गत आघाडीवर, रिझव्र्ह बँकेची द्विमासिक पतधोरण आढाव्याच्या बैठकीला सुरुवात झाली असून मध्यवर्ती बँकेकडून रेपो दरात २५ ते ५० आधार िबदूंच्या वाढीची बाजाराला अपेक्षा आहे, असे मत जिओजित फायनान्शियल सव्र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.
रुपया ६८ पैसे गडगडला
मुंबई : मागील चार सत्रांत बळावलेल्या रुपयाने बुधवारी पुन्हा डॉलरपुढे नांगी टाकली. बुधवारी एकाच व्यवहारात रुपयाचे मूल्य ६८ पैशांनी आपटले. स्थानिक चलन बाजारात डॉलरसमोर मोठय़ा फरकाने कमकुवत होत रुपया पुन्हा ७९ पुढे गडगडत ७९.२१ पातळीवर स्थिरावला. रुपयाने बुधवारच्या सत्राची सुरुवात ७८.७० अशा नरमाईनेच केली आणि पुढे ही अशक्तता आणखीच वाढली. व्यवहारसत्रात चलनाने ७९.२१ या दिवसभरातील नीचांकी पातळीला स्पर्श केला आणि त्याच पातळीवर तो व्यवहाराअंती स्थिरावला. रुपयाच्या घसरणीची वाढलेली तीव्रता पाहता, तो पुन्हा लवकरच प्रति डॉलर ८० ची वेस ओलांडण्याची शक्यता अर्थतज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.