२०१६ मधील आतापर्यंतचा प्रतिसाद

सध्या प्राथमिक भांडवली बाजार जोरावर असल्याचे आणि प्रारंभिक भागविक्रींना (आयपीओ) दमदार प्रतिसाद मिळाल्याची उदाहरणे असली तरी चालू २०१६ सालात बाजारात दाखल झालेल्या निम्म्याहून अधिक कंपन्यांना भागविक्री किमतीच्या वरही डोके वर काढता आले नसल्याचे आढळून येत आहे. काही कंपन्यांनी तर गुंतवणूकदारांना उणे ३१ टक्के इथपर्यंत नकारात्मक परतावा दिला आहे.

चालू वर्षांत बाजारात सात कंपन्यांनी भागविक्री पूर्ण केली आहे. यापैकी इक्विटास होल्डिंग्जने नुकतीच भागविक्रीची प्रक्रिया पूर्ण केली असली तरी तिच्या समभागांची बाजारात अद्याप सूचिबद्ध झालेले नाहीत.

सूचिबद्ध झालेल्या सहा कंपन्यांपैकी चार कंपन्यांचे समभाग मूल्य हे भागविक्रीपश्चात ज्या किमतीला गुंतवणूकदारांना समभाग वितरित करण्यात आले त्या किमतीच्या खाली गेले आहेत. उर्वरित दोन कंपन्यांनी विक्री किमतीच्या वर राहून फायदा दर्शविला आहे.

२०१५ सालच्या शेवटच्या दिवसाच्या बंद भावापासून, चालू वर्षांत आजतागायत बीएसई सेन्सेक्स निर्देशांक ४९१ अंश खाली अर्थात १.८७ टक्के घसरलेला आहे. केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत मांडला जात असताना, २९ फेब्रुवारी २०१६ रोजी सेन्सेक्सने २२,४९४.६१ हा चालू वर्षांतील तळ दाखविला आहे.

२०१५ सालच्या उत्तरार्धात, आरोग्य निगा व औषधी क्षेत्रातील अल्केम लॅब (२७%), नारायण हृदयालय (१८%), डॉ. लाल पॅथलॅब (८४%) तसेच इंटरग्लोब एव्हिएशन (३४%), एसएच केळकर (३३%) या नोव्हेंबर-डिसेंबर म्हणजे काही महिने आधीच बाजारात दाखल झालेल्या कंपन्यांनी मात्र गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.

Untitled-24

 

 

Story img Loader