वाढती महागाई आणि यंदा सरासरीइतका पाऊस न होण्याच्या कयासापोटी व्याजदर कपातीची शक्यता संपुष्टात आल्याची भीती आता भांडवली बाजारातून दूर पळाली असून निवडणुकीची ‘लहर’ जसजशी वेगाने पसरत आहे तसतसा प्रमुख निर्देशांकाचा पुन्हा विक्रमी सूराचा प्रवास सुरू झाला आहे. नव्याने होत असलेली गुंतवणूक आणिखरेदीच्या जोरावर मुंबईसह राष्ट्रीय शेअर बाजारही सप्ताहारंभीच ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचला. सोमवारच्या व्यवहारात सेन्सेक्स २२,७९५.५८; तर निफ्टी ६,८२५.४५ पर्यंत झेपावला. दिवसअखेर मात्र त्यांनी या पातळ्यांपासून काहीशी माघार घेतली तर सकारात्मक वाढीसह ते दिवस अखेर स्थिरावले.
सोमवारच्या सत्राअखेर १३५.९९ अंश वाढ होऊन सेन्सेक्स २२,७६४.८३ वर, तर निफ्टी ३८.२५ अंश वाढीसह ६,८१७.६५ वर बंद झाला. गेल्या आठवडय़ात बाजार नरम राहिला आहे. यादरम्यान सलग तीन दिवसांतील घसरण मुंबई निर्देशांकाने शुक्रवारच्या एकाच दिवसाच्या वाढीसह भरून काढली असली तरी दहा दिवसांपूर्वीच्या विक्रमापासून सेन्सेक्स लांबच होता. नव्या आठवडय़ाची सुरुवात २२,६४४ अशी स्थिर होत सकाळच्या सत्रातच तो २२,६३६ या दिवसाच्या नीचांकावरही येऊन ठेपला.
सोमवारच्या सत्राच्या अखेरच्या टप्प्यात मात्र तो एकदम उंचावत २२,७९५.५८ या विक्रमी टप्प्यावर पोहोचला. तर निफ्टीनेही याच दरम्यान ६,८०० चा स्तर मागे टाकत नवा ऐतिहासिक पल्ला गाठला. भांडवली बाजार यापूर्वी १० एप्रिल रोजी सर्वोच्च स्थानी होते. बाजारात टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचसीएल टेक्नोलॉजीज, सेसा स्टरलाइटसारख्या आघाडीच्या कंपनी समभागांना त्यांच्या ताज्या सकारात्मक व्यवसाय प्रतिसादामुळे मागणी राहिली. लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, अ‍ॅक्सिस बँक, भारती एअरटेल, भेल, कोल इंडिया यांचीही साथ राहिली.
सेन्सेक्समधील १८ समभाग वधारले, तर भांडवली वस्तू निर्देशांक आघाडीवर राहिला. बँक समभागांनाही मागणी राहिली. यामध्ये आयसीआयसीआय बँकेचाही समावेश राहिला. २.६२ टक्के वाढीचा स्टेट बँक व ४ टक्के वधारणीचा लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो हे सेन्सेक्समध्ये आघाडीवर होते. घसरणीत ६.६५ टक्क्यांसह आपटणारा सेन्सेक्समधील विप्रोचा समभाग मात्र सुमार कामगिरी नोंदविता झाला. मिड कॅप व स्मॉल कॅपदेखील अनुक्र मे ०.७९ व १.३८ टक्क्यांनी  उंचावले.
चालू महिन्यातील वायदापूर्तीच्या शेवटचा दिवस यंदा बुधवारी आहे. गुरुवारी मतदानामुळे भांडवली बाजारात व्यवहार होणार नाहीत.

३० पैशांची एप्रिलमधील सर्वात मोठी घसरण
भांडवली बाजारात तेजी पुन्हा अवतरली, असे चित्र असताना परकीय चलन व्यवहारात रुपया मात्र घसरणीला आला आहे. सोमवारी भारतीय चलन ३० पैशांनी रोडावत ६०.५९ पर्यंत घसरले. यामुळे चलनाने एप्रिल महिन्यातील नीचांक स्तर गाठला आहे. तेल आयातदारांकडून अमेरिकन डॉलरला मागणी आल्याचे हे चिन्ह आहे. तेजीच्या भांडवली बाजारासाठी विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून
डॉलर-पौंडांचा ओघ नसता, तर रुपयात याहून मोठी घसरण दिसली असती.
सोमवारच्या व्यवहारात रुपया ६०.६१ पर्यंत तळात गेला होता. दिवसअखेर तो काहीसा सावरत ६०.५९ वर स्थिरावला, तरी गुरुवारच्या तुलनेत तो ३० पैशांनी रोडावला.

Story img Loader