भांडवली बाजारातील गेल्या सहा सत्रातील वाढीला गुरुवारी अखेर चाप बसला. गुंतवणूकदारांच्या नफेखोरीच्या धोरणामुळे मुंबई शेअर बाजाराचा ‘सेन्सेक्स’ ५६.१५ अंशांनी खाली येत १८,८४६.२६ वर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा ‘निफ्टी’ २१.३५ अंश घसरणीसह ५,७३८.७५ वर बंद झाला.
‘सेन्सेक्स’ गेल्या सहाही सत्रातील वाढीमुळे ४७१.५६ अंशांनी वधारला होता. १८,९०० ची पातळी गाठत तो महिन्याभराच्या उच्चांकावरही जाऊन ठेपला होता. आज मात्र सकाळपासूनच आशियाई बाजारातील निराशाजनक वातावरणामुळे व्यवहाराच्या सुरुवातीलाच कालच्या तुलनेत १६६ अंशांची घट दाखवीत सेन्सेक्स १८,७३६.४५ या दिवसाच्या नीचांकापर्यंत आला. युरोपीयन बाजारांतील सकारात्मकतेच्या जोरावर काहीशी कामगिरी उंचावत ‘सेन्सेक्स’ने मोठय़ा घसरणीपासून माघार घेतली. मात्र दिवसअखेर नकारात्मकताच नोंदविली.
युरोपीय मध्यवर्ती बँकेच्या उशिरा होणाऱ्या बैठकीत ग्रीससारख्या देशाला वित्तीय सहकार्य मिळण्याच्या आशेने कॅक, डॅक्स, फुट्सी हे तेथील निर्देशांक अध्र्या टक्क्यापर्यंत वाढीसह खुले झाले. तर चीन, हॉन्गकॉन्ग, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर, तैवान या आशियाई बाजारांमध्ये तब्बल २.५० टक्क्यांपर्यंत घसरण दिसून आली. टाटा मोटर्स, भारती एअरटेल, भारतीय स्टेट बँक सारख्या वधारत्या समभागांनी निर्देशांकातील घसरण थोपविण्यास मदत केली.   

Story img Loader