केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल (दि.1) सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे शेअर बाजाराने जोरदार स्वागत केले आहे. सलग दुसऱ्या दिवशी भांडवली बाजारात तेजी बघायला मिळत आहे. आज (दि.2) सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्स 1000 अंकांनी वधारला असून निफ्टीनेही 300 अंकांची झेप घेतली आहे.

बजेटच्या दिवशी 48,600 अंकांवर बंद झालेला सेन्सेक्स आज बजेटच्या दुसऱ्या दिवशी 593 अंकांच्या उसळीसह 49,193 अंकांवर सुरू झाला. त्यानंतर सेन्सेक्समध्ये सतत तेजी बघायला मिळाली आणि सेन्सेक्सने 50 हजारांचा आकडाही ओलांडला. तर, निफ्टीही बजेटच्या दिवशी 14,281 अंकांवर बंद झाल्यानंतर आज 200 अंकांच्या तेजीसह 14,481 अंकांवर सुरू झाला आणि 14,700 अंकांपर्यंत पोहोचला. निफ्टीमध्येही दिवसाच्या सुरूवातीला तेजी बघायला मिळत आहे.

निर्देशांकाची झेप पाहता, शेअर बाजाराच्या दृष्टीकोनातून हा विकासाभिमुख अर्थसंकल्प आहे. बजेट सादर केल्यानंतर कालही सेन्सेक्स 2300 अंकांनी वधारला होता. यात गुंतवणूकदारांची मालमत्ता 5.50 लाख कोटींनी वाढली होती. आर्थिक विकासाला गती देण्यासाठी सरकारी तिजोरी खुली करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचं या अर्थसंकल्पामधून दिसून आलं. मोठ्या प्रमाणात गुंतवणूक, रोजगारनिर्मिती करुन लोकांना हातात पैसा उपलब्ध करुन देण्याचा सरकारचा हेतू अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केला. याचेच पडसाद शेअर बाजारातही उमटल्याचं दिसत असून एकूणच केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यापासून शेअर बाजारात तेजीचं वातावरण पाहायला मिळत आहे.

Story img Loader