मुंबई : जागतिक भांडवली बाजारातील प्रतिकूल संकेत, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून समभाग विक्रीचा मारा आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या अग्रणी समभागात गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावल्याने भांडवली बाजाराने सप्ताहारंभी नकारात्मक सुरुवात केली. गेल्या आठवडय़ातील सलग सहा सत्रातील तेजी रथाला मंदीवाल्यांनी लगाम लावला.

सोमवारी दिवसअखेर सेन्सेक्स ३०६.०१ अंशांच्या घसरणीसह ५५,७६६.२२ पातळीवर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये ८८.४५ अंशांची घसरण झाली आणि तो १६,६३१ पातळीवर बंद झाला.

भांडवली बाजारावर सध्या बाह्य आणि अंतर्गत अशा दोन्ही घटकांचा प्रभाव दिसून येत आहे. बाह्य घटकांमध्ये फेडरल रिझव्‍‌र्हच्या पत धोरण समितीकडून बुधवारी व्याजदर जाहीर केले जाणार आहेत. वाढती महागाई बघता व्याजदरात थेट पाऊण टक्क्यांची वाढ केली जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे बाजारावर परिणाम करणारा अंतर्गत घटक म्हणजे परदेशी संस्थामक गुंतवणूकदारांकडून समभाग विक्रीचा मारा कायम आहे. अशा दोन्ही घटकांच्या प्रभावामुळे सलग सहा सत्रातील तेजीला लगाम बसला.

Story img Loader