नाटक पाहायचे असेल तर ते विंगेत बसून नीट कळत नाही, थेट समोर प्रेक्षकांमध्ये बसूनच त्याचा पूर्ण आस्वाद घेता येतो. म्हणजे लोकांची प्रतिक्रिया काय आहे, कुठे अभिनेता कमी पडतो आहे वगरे लक्षात येते. त्याचप्रमाणे ‘इन्व्हेस्टर एज्युकेशन’वगरे नामाभिधान घेऊन आलिशान केबिनमध्ये बसून गप्पा मारणे ही आजकाल फॅशन झाली आहे. मग त्यावर अनेक संस्था लाखो रुपये खर्च करतात. पण जे काही चालले आहे त्याबाबत प्रत्यक्ष श्रोत्यांचे, वाचकांचे काय मत आहे, त्यांना ते आवडते आहे का, कळते आहे का हे जाणून घ्यायचा फारच थोडे लोक किंवा संस्था प्रयत्न करतात. केवळ इतके लाख रुपये आम्ही इन्व्हेस्टर एज्युकेशनसाठी खर्च केले आणि इतके हजार गुंतवणूकदार सुशिक्षित केले अशी आकडेवारी माध्यमांच्या मार्फत प्रसारित केली की काम झाले ही भावना.
थेट लोकांशी संपर्क साधून त्यांना काय हवे आहे, कोणत्या पातळीवर त्यांना माहिती दिली पाहिजे हे कुणाच्या गावी नसते. थोडक्यात थेट श्रोत्यांशी किंवा वाचकांशी संपर्क नसल्यामुळे हे पढतपंडित आपल्याच कार्यपद्धतीवर खूश होऊन फुशारकी मारीत असतात. मध्यंतरी एका एनजीओने गोव्यात गुंतवणूकदारांसाठी मेळावा आयोजित केला होता. अर्थात समोर असलेले श्रोते हे शेअर बाजार या विषयाशी पूर्णपणे अनभिज्ञ आहेत हे वक्त्यांना सांगून तशा प्रकारचे भाषण करावे असे आवर्जून सांगितले होते. आता अशा परिस्थितीत डिमॅट खाते म्हणजे बँकेतील बचत खात्यासारखेच आहे. फरक इतकाच की बचत खात्यात आपण पसे ठेवतो तर डिमॅट खात्यात शेअर्स ठेवतो. शिवाय बचत खाते उघडायला जी केवायसी दस्तऐवज लागतात तेच डिमॅट खाते उघडायला पण लागतात. इतके सोपे सरळ सांगितले असते तर उपस्थित श्रोत्यांना ‘हे सोपं आहे’ अशी एक जाणीव होऊन त्यातील अनेकजण पुढे ऐकायला प्रवृत्त झाले असते. पण त्या मेळाव्यासाठी वक्ता म्हणून दूर नागपूरहून आलेल्या एका विदुषीने हेज फंड, जीडीपी, आयएमएफ, अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी वगरे शब्दांची आतषबाजी करून ‘मी किती विद्वताप्रचुर आणि ग्रेट आहे’ अशा प्रकारे श्रोत्यांवर चाप मारण्याच्या प्रयत्नात पूर्ण कार्यक्रमाचा बट्टय़ाबोळ करून एकप्रकारे आयोजक संस्थेलाच अडचणीत आणले! कारण शेवटी श्रोते दूषणे देणार ते आयोजकांनाच.
आíथक साक्षरता ही एक सातत्याने सावकाश चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे आजही पाच-पाच, दहा-दहा वष्रे शेअर बाजारात व्यवहार करणाऱ्या गुंतवणूकदारांना अनेक लहान लहान बाबींचीदेखील नीट माहिती नसते. उदाहरणार्थ टी+२ यंत्रणेत एखादे वेळी दलाल टी+३ या दिवशीदेखील शेअर्स आपल्या ग्राहकाला देऊ शकतो हे अनेकांना माहीत नसते. पण सेबीचा तसा नियम आहे. ‘गेली १२ वष्रे माझे डिमॅट खाते आहे पण त्याची पूर्ण माहिती आज मला झाली व सर्व शंका दूर झाल्या’ असे प्रांजळप्रणे सांगणारे एक प्राध्यापक परवा पुणे येथील कॉसमॉस बँक आयोजित माझ्या व्याख्यानादरम्यान भेटले याचा हाच अर्थ आहे. त्यात वावगे किंवा हसण्यासारखे काही नाही. लोक आयुष्यभर ज्ञानेश्वरी वाचत असतात, पण निवृत्त होता होता तिच्यातील अर्थ कळायला लागतो असे पु.ल. एकदा विनोदाने म्हणाले होते. वर उल्लेख केले त्या विदुषीचे भाषण म्हणजे ‘नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे’ असाच प्रकार होता.  असे अनेक महाभाग असतात, ज्यांची थेट श्रोत्यांशी किंवा वाचकांशी कधीच नाळ जोडली गेलेली नसते. त्यामुळे ‘डिमॅट वगरे आजकाल सबको मालूम है तुम अ‍ॅडव्हान्स टॉपिक्स बोलो’ म्हणून आपल्या हाताखालील लोकांना आदेश देणाऱ्या एखाद्या बँकेच्या जनरल मॅनेजरची कीव करावीशी वाटते. कारण हे महाशय आपल्या वातानुकूलित केबिनच्या कधी बाहेरच पडलेले नसतात! वास्तवाशी यांची पूर्णपणे फारकत झालेली असते. शेअर बाजारावर व्याख्याने देण्यासाठी कोकणातील आचरा किंवा पळसंब अशा गावात मी जातो आणि त्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या लौकिक अर्थाने फारसे शिक्षण न झालेल्या गृहिणीदेखील ‘हे मला नीट समजले’ असे आवर्जून सांगतात. तेच माझ्या ९६० कार्यक्रमांचे यश आहे असे मी समजतो. गेली चार वष्रे सातत्याने ‘लोकसता’मधील हे सदर सुरू आहे, ज्याला आजवर हजारो वाचकांनी केवळ आपली पसंती कळवली आहे असे नाही तर वेळोवेळी प्रश्न विचारून आपले शंकासमाधान करून घेतले आहे. जे वाचक ईमेल करण्यास असमर्थ असतील, त्यांनी लोकसत्ताकडून माझा फोन नंबर घेऊन संपर्क साधावा किंवा आपले प्रश्न पत्राद्वारे माझ्या सीडीएसएल, बीएसई बििल्डग, सोळावा मजला, फोर्ट, मुंबई ४००००१ या पत्त्यावर पाठवावेत. अनेक महाविद्यालयांकडून मला विनंती केली जाते की सीडीएसएलला आमचे विद्यार्थी भेट देऊ इच्छितात, जेणेकरून बीएसईमध्ये शेअर्सचे सौदे कसे होतात, ट्रेडिंग रिंग कशी असते, शेअर्सचे सेटलमेंट कशा प्रकारे केले जाते हे पाहता येईल. माझी सर्व महाविद्यालयांना कळकळीची विनंती अशी आहे की दूरवरून खर्च करून आपले विद्यार्थी इथे घेऊन येण्यात खरे तर काही अर्थ नाही. कारण आपण म्हणता ती ट्रेिडग िरग आता इतिहासजमा झाली आहे. १९९४ सालापासून सर्व व्यवहार संगणकामार्फत होतात. पूर्वी जवळजवळ सर्व दलाल मंडळींची कार्यालये तरी बीएसई इमारतीत होती ती स्थितीदेखील आता राहिलेली नाही. कारण देशभरात सर्वत्र आपले जाळे विणून हे काम दलाल मंडळी करीत असतात. तात्पर्य, पाहाण्यासारखे काय तर फक्त इमारत! आता सवाल इथे कामकाज कसे होते, विविध खात्यांचे काम काय, पे-इन, पे-आऊट म्हणजे काय वगरे शेकडो प्रश्न. त्यांची उत्तरे इथे येऊन घेण्यापेक्षा थेट तुमच्या महाविद्यालयात मला बोलवा. सीडीएसएलतर्फे ही सर्व माहिती सोप्या शब्दात मी येऊन देईन! ऐंशी विद्यार्थ्यांचा प्रवास खर्च आणि किमान आठ तास वेळ वाया न घालवता मी एकटय़ाने तुमच्या महाविद्यालयात येणे हे खूपच कमी खर्चाचे आणि सयुक्तिक आहे. सांप्रत सर्वत्र गोपनीयता काटेकोरपणे पाळली जाते त्यामुळे सीडीएसएल किंवा बीएसई येथील मोठमोठे सव्‍‌र्हर्स बाहेरूनदेखील पाहणे तुम्हाला शक्य होणार नाही! हा व्यावहारिक विचार मांडला आहे आणि तो रास्त आहे. मी कसल्याही प्रकारे मानधन घेत नाही. या व्याख्यानातून तुम्हाला अपेक्षित आहे, त्याहून कितीतरी अधिक माहिती आणि ज्ञान मिळेल हे कळकळीने सांगतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा