मुंबई : सकाळच्या सत्रात घसरण अनुभवल्यानंतरही, परकीय गुंतवणुकीचा ओघ आणि जागतिक बाजारपेठेतील कल बघता गुंतवणूकदारांनी केलेल्या समभाग खरेदीने मंगळवारी सलग तिसऱ्या सत्रात भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांकांनी आगेकूच साधली. सेन्सेक्समध्ये २४६ अंशांची भर पडली.

चढ-उतारांचे झोके सुरू राहिल्यानंतर, दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक- सेन्सेक्स २४६.४७ अंशांनी वधारून ५४,७६७.६२ पातळीवर बंद झाला. सत्रात सेन्सेक्सने ५४,८१७.५२ या उच्चांकी पातळीला स्पर्श केला होता, त्याचा नीचांक जवळपास ६०० अंश खाली ५४,२३२.८२ असा होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक – निफ्टीमध्ये ६२.०५ अंशांची वाढ झाली आणि तो १६,३४०.५५ पातळीवर स्थिरावला.

देशांतर्गत पातळीवर माहिती-तंत्रज्ञान आणि औषधी निर्माण क्षेत्रांमधील समभागांमध्ये सुरू असलेल्या मोठय़ा चढ-उतरांमुळे प्रमुख निर्देशांकांवर अस्थिरतेचे सावट दिसून आले. मात्र गुंतवणूकदारांनी बँकिंग, वाहन निर्मिती आणि धातू क्षेत्रातील समभाग खरेदी केल्यामुळे बाजारात तेजी कायम राहिली. जागतिक पातळीवर आर्थिक महामंदीच्या भीतीने अ‍ॅपल इन्कसारख्या आघाडीच्या तंत्रज्ञानाधारित कंपन्यांकडून नवीन तंत्रज्ञ-भरतीचे प्रमाण कमी झाल्याने विकसित देशांच्या बाजारांवर त्याचे नकारात्मक पडसाद उमटले. मात्र, भारतीय अर्थव्यवस्थेच्या मजबूत मूलभूत घटकांमुळे देशांतर्गत अर्थव्यवस्थेतील मंदीचा प्रभाव तात्काळ कमी होऊन जागतिक पातळीवर प्रगत देशांच्या तुलनेत तो सौम्य असेल, असा विश्वास जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केला आहे.

सेन्सेक्समध्ये अ‍ॅक्सिस बँक, मिहद्र अँड मिहद्र, बजाज फिनसव्‍‌र्ह, इंडसइंड बँक, टाटा स्टील, अल्ट्राटेक सीमेंट आणि स्टेट बँक यांचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. तर दुसरीकडे नेस्ले इंडिया, एचसीएल टेक्नॉलॉजीज, सन फार्मा, कोटक मिहद्र बँक, इन्फोसिस, डॉ रेड्डीज आणि एशियन पेंट्सच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली.

परदेशी गुंतवणूकदारांकडून समभाग खरेदी

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सोमवारच्या सत्रात चौफेर समभाग खरेदी केली. सोमवारच्या सत्रात परदेशी गुंतवणूकदारांची समभाग विक्रीपेक्षा समभाग खरेदी अधिक राहिली. त्यांनी १५६.०८ कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी केले.निर्देशांकांची आगेकूच कायम असून तीन सत्रांत मिळून सेन्सेक्सने १,३५१ अंशांची भर घातली आहे.

Story img Loader