मुंबई : अमेरिकी मध्यवर्ती बँक – फेडरल रिझव्‍‌र्हकडून करण्यात येणाऱ्या संभाव्य व्याजदर वाढीच्या निर्णयाआधी बुधवारच्या सत्रात गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला. त्या परिणामी सलग दोन सत्रांत तेजीत असलेल्या भांडवली बाजाराचा ताबा मंदीवाल्यांनी घेतला आणि निर्देशांकांत घसरण दिसून आली. 

जागतिक बाजारातील संमिश्र कलामुळे बुधवारी दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक २६२.९६ अंशांच्या म्हणजेच ०.४४ टक्क्यांच्या घसरणीसह ५९,४५६.७८ पातळीवर स्थिरावला. सुरुवात सकारात्मक करणाऱ्या ‘सेन्सेक्स’ने दिवसभरातील अस्थिर व्यवहारात ४४४.३४ अंश गमावत ५९,१७५.४० अंशांची नीचांकी पातळी गाठली होती. दुसरीकडे निफ्टीमध्ये ९७.९० अंशांची घसरण झाली आणि तो १७,७१८.३५ पातळीवर बंद झाला.

फेडरल रिझव्‍‌र्हच्या धोरणाच्या घोषणेपूर्वी जगभरातील भांडवली बाजारांमध्ये अस्थिरतेचे वातावरण होते. शिवाय युक्रेनमध्ये पुन्हा रशियन सैन्याची जमवाजमव सुरू झाली असल्याच्या वृत्तामुळे भू-राजकीय तणाव वाढला आहे. त्या परिणामी महागाईच्या भडक्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. जगात कुठेही सुरू असलेल्या लष्करी कारवाईचा नजीकच्या काळात जागतिक अर्थव्यवस्थेसह देशाच्या अर्थकारणावर विपरीत परिणामाची शक्यता आहे आणि त्याच चिंतेने बुधवारी बाजाराला घेरले, असे जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले.

सेन्सेक्समध्ये इंडसइंड बँकेच्या समभागात ३.१९ टक्क्यांची सर्वाधिक घसरण झाली. त्यापाठोपाठ पॉवर ग्रिड, अल्ट्राटेक सिमेंट, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, एनटीपीसी, एचसीएल टेक्नॉलॉजीज, डॉ रेड्डीज, टीसीएस व भारती एअरटेल यांच्या समभागात घसरण झाली. दुसरीकडे हिंदूस्थान युनिलिव्हर, आयटीसी, बजाज फाय., टेक मिहद्र, रिलायन्स इंडस्ट्रीज, नेस्ले व एचडीएफसी बँकेचे समभाग प्रत्येकी १.६० टक्क्यांपर्यंत वधारले.

रुपया पुन्हा ऐंशीवर

डॉलरच्या तुलनेत रुपयाने बुधवारी एकाच व्यवहारात २६ पैशांची आपटी नोंदविली. परिणामी परकीय चलनविनिमय मंचावर ते सत्रअखेर ८० या पातळीवर स्थिरावले. इतर चलनांच्या तुलनेत मजबूत होणारा डॉलर आणि देशांतर्गत भांडवली बाजारात झालेल्या घसरणीमुळे रुपयाने पुन्हा ऐंशीची पातळी गाठली. रुपयाने ७९.८१ या पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली. पुढे दिवसभरातील सत्रात ७९.७९ ही उच्चांकी पातळी त्याने गाठली. अखेर ८० हा तळ गाठत तो त्याच पातळीवर दिवसअखेर विसावला.

Story img Loader