मागील सहा भागांच्या मालिकेतून डिमॅट खाती आणि एकूणच शेअर बाजार याबाबत लोकांना आपलेपणा वाटणार नाही अशा प्रकारे वर्तन विविध घटकांकडून केले जाते त्याविषयी सविस्तर लिहिले. अनेक संबंधितांनी त्याची दखल घेऊन काही स्तुत्य पावले टाकलीदेखील, पण ‘कुत्र्याचे शेपूट वाकडे’ या न्यायाने अजूनही काही झारीतले शुक्राचार्य आहेत याचा प्रत्यय नुकताच आला.
वस्तुत: कुठल्याही डिमॅट खात्यातून कुठल्याही डिमॅट खात्यात शेअर्स हस्तांतरित करता येतात हे तत्त्वत: सत्य आहेच. माध्यम अर्थातच ‘डिलिव्हरी इंस्ट्रक्शन स्लिप’! मग ते शेअर्स माझ्या खात्यातून ब्रोकरच्या खात्यात जाऊ शकतात किंवा माझ्या मित्राच्या/नातेवाईकाच्यादेखील. संबंधित व्यक्तीचा डिमॅट खाते क्रमांक लिहिला की झाले. फरक इतकाच की ब्रोकरच्या खात्यात शेअर्स हस्तांतरित करायचे असतील तर ज्या दिवशी स्टॉक एक्स्चेंजवर हा व्यवहार झाला असेल त्या दिवशीचा सेटलमेंट क्रमांक स्लिपवर लिहावा लागतो जो ब्रोकर आपल्याला सांगतो. जर शेअर्स मित्राच्या खात्यात किंवा माझ्या स्वत:च्या दुसऱ्या डिमॅट खात्यात हस्तांतरित करायचे असतील तर हा सेटलमेंट क्रमांक लिहायचा नाही, कारण हा स्टॉक एक्स्चेंजवर झालेला व्यवहार नाही. मात्र असे करताना सेबीच्या नियमाप्रमाणे स्लिपवर त्या शेअर्सची किंमत लिहावी लागते किंवा भेट म्हणून शेअर्स दिले असतील तर तसे लिहावे लागते इतकेच. एका बडय़ा बँकेत अनिलचे डिमॅट खाते आहे, त्यातून अनिलच्या दुसऱ्या एका सहकारी बँकेत असलेल्या डिमॅट खात्यात शेअर्स हस्तांतरित करायचे आहेत. मात्र योग्य ती स्लिप भरून दिली असतानाही बडय़ा बँकेने ती स्लिप स्वीकारायला नकार दिला. का तर म्हणे त्या सहकारी बँकेकडून लिहून आणा की सदर शेअर्स आम्ही क्रेडिट करून घेऊ म्हणून! कुणी केला हा नियम? असा कुठेही नियम नसताना आगाऊपणा करून ग्राहकाला फुकटचा त्रास द्यायचा. अनिलने मला फोन केला असता मी व्याख्यानासाठी गुहागरला प्रवासात होतो. त्यामुळे जास्त काही करू शकत नव्हतो. तरी अनिलला मी म्हटले की, परत त्या बडय़ा बँकेत जा आणि तिथून मला फोन कर. त्या बँकबाबूने फोनवर बोलायला नकार दिला तर सरळ सेबीकडे तक्रार करीन म्हणून सांग आणि खरोखरच तशी तक्रार कर. त्याप्रमाणे अनिलने तसे सांगताच बाबू सरळ झाले आणि स्लिप स्वीकारली. ग्राहकाला अशा प्रकारे त्रास द्या, असे ना सेबीने सांगितले ना त्या बँकेच्या हेड ऑफिसने. हेच स्थानिक अतिशहाणे बाबू लोक! अर्थात मुंबईत परत आल्यावर त्या बँकेच्या संबंधित विभागाकडे मी झाल्या प्रकाराबाबत बोललो व योग्य त्या सूचना सर्वच शाखांना द्या, असे सांगितले व त्यांनी तसे करण्याचे मान्य केले.
या उदाहरणात मित्राला शेअर्स दिले असतील तर शेअर्सची किंमत लिहावी लागते असे म्हटले याचे कारण हा जो काही व्यवहार झाला त्यात पारदर्शकता असावी, असा सेबीचा आग्रह असतो व त्यात काहीच गर नाही, कारण खरोखरच ते शेअर्स मी देणगी म्हणून दिले असतील तर तसे लिहिण्यात मला का अडचण यावी? छाया पाटील यांनी पनवेलच्या कार्यक्रमात छान प्रश्न विचारला होता की, जेव्हा आपण ब्रोकरला शेअर्स हस्तांतरित करतो तेव्हा अशा प्रकारे शेअर्सची किंमत का लिहावी लागत नाही? तिथे मग पारदर्शकता कुठे गेली? याचे उत्तर असे आहे की, आपण ब्रोकरच्या खात्यात शेअर्स हस्तांतरित करीत असताना स्लिपमध्ये सेटलमेंट क्रमांक लिहीत असतो याचाच अर्थ तो व्यवहार स्टॉक एक्स्चेंजच्या सव्र्हरवर नोंदवला गेला आहे की काय किमतीला ते शेअर्स मी विकले आहेत. अर्थात ही नोंद/माहिती गरज पडेल तेव्हा सेबी स्टॉक एक्स्चेंजकडून मागवून घेऊ शकते ना! त्या कार्यक्रमात सर्वोत्तम प्रश्नाला दिले जाणारे बक्षीस छायाताईंनी पटकावले हे सांगायला नकोच!! एका ब्रोकरने ‘क्ष’ कंपनीचे ५०० शेअर्स विकायची ऑर्डर आपल्या बोल्ट टर्मिनलमध्ये नोंदवली. समोर समजा पाच ब्रोकर प्रत्येकी १०० शेअर्स त्यांच्या ग्राहकासाठी खरेदीची ऑर्डर टाकीत असतील तर पाचशेच्या समोर हे पाच व्यवहार जुळतील. अर्थात विकणाऱ्या ग्राहकाला जी काँट्रॅक्ट नोट मिळेल त्यात १००चे पाच व्यवहार दिसतील. मात्र मला समोर ५०० शेअर्स घेणारा एकच ग्राहक हवा असेल म्हणजे तुकडय़ातुकडय़ांत मला शेअर्स विकायचे नाहीत अशी अट असेल तर तसेही करता येते. त्याला ‘ब्लॉक डील’ असे म्हणतात. ‘ब्लॉक डील’विषयी पुढील लेखात वाचू या.
श.. शेअर बाजाराचा : पण कुत्र्याचे शेपूट वाकडेच!
मागील सहा भागांच्या मालिकेतून डिमॅट खाती आणि एकूणच शेअर बाजार याबाबत लोकांना आपलेपणा वाटणार नाही अशा प्रकारे वर्तन विविध घटकांकडून केले जाते त्याविषयी सविस्तर लिहिले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 23-08-2013 at 12:46 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shares can be transferred from demat account demat to any demat account demat