मुथ्थूट फिनकॉर्पकडून ‘माय ज्वेल बॉक्स’ अनोखे मोबाइल अ‍ॅप!
भारतात पहिल्यांदाच सोन्याच्या ग्राहकांना त्यांच्याकडील सर्व सुवर्ण मालमत्ता केवळ बोटाने कळ दाबल्यासरशी वस्तुत: एका ठिकाणी जतन करून ठेवता येईल आणि मनात येईल तेव्हा तिचे एकूण मूल्य जाणून घेता येईल. मुथ्थूट पापाचन समूहाची आघाडीची आणि विविधांगी वित्तीय सेवा कंपनी मुथ्थूट फिनकॉर्पने सोन्याचे ग्राहक ज्यात अर्थात महिलांची बहुसंख्या आहे त्यांच्यासाठी आपल्या मौल्यवान सुवर्णपूंजीचा एक-संचय जरी तो आभासी (व्हच्र्युअल) का असेना सहजसाध्य करणारी ‘माय ज्वेल बॉक्स’ ही अनोखी संकल्पना पुढे आणली आहे. अँड्रॉइड प्रणालीवर आधारित या मोबाइल अ‍ॅपला मिळत असलेला प्रारंभिक प्रतिसाद खूपच उत्साहवर्धक असून, लवकरच अशा प्रकारची सेवा आयओएस मंचावर दाखल करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे, असे मुथ्थूट पापाचन समूहाचे संचालक थॉमस जॉर्ज मुथ्थूट यांनी स्पष्ट केले. व्हच्र्युअल मंचावर आपल्या सर्व सुवर्ण आभूषणांचा संचय करण्यास मदतकारक असा हा अभिनव प्रकार आहे. शिवाय अगदी काही सेकंदात सोन्यातील मालमत्तेचे ताजे मूल्य ग्राहकांना अचूकपणे जाणून घेण्याची सोयही यात आहे. या अ‍ॅपमध्ये सोन्याचा विद्यमान प्रति ग्रॅम दर नियमितपणे अद्ययावत असतो. ग्राहकांना ज्या आधारे एकूण सुवर्ण मालमत्तेचे मूल्य समजून किती सोने-तारण कर्ज मिळू शकेल, याचीही माहिती मिळेल. हा डेटा केवळ ग्राहकाच्या हँडसेट्सवर जतन होत असल्याने तो पूर्णपणे सुरक्षित ठरतो. दागिन्यांच्या फोटो घेऊन त्यांचे बांगडय़ा, कंठहार, अंगठी वगैरे प्रकारात वर्गीकरण करण्याचीही हे मोबाईल अ‍ॅप संधी देते. कोणाही ग्राहकांना ‘गुगल प्ले’वर जाऊन ‘माय ज्वेल बॉक्स’ हे अ‍ॅप डाऊनलोड करता येईल.
गोदरेजचा चेंबूरमध्ये पुनर्विकास
मुंबई उपनगरातील चेंबूर येथील एक पुनर्विकास प्रकल्प साकारण्याचे गोदरेज समूहाने ठरविले आहे. गोदरेज प्रॉपट्रीजच्या वतीने सहगार नगर विभाग २ मध्ये २०० घरांचे निवासी प्रकल्प विकसित केले जाणार आहेत. १९५४ मध्ये म्हाडाने बांधलेल्या या प्रकल्पाच्या नूतनीकरणासाठी येथील सहा गृहनिर्माण संस्था गोदरेजसह भागीदारी करण्यास तयार झाल्या आहेत. यामाध्यमातून कंपनीला ७.५० लाख चौरस फूट विक्रीयोग्य जागा मिळणार आहे. हा प्रकल्प ३.९ एकर जागेवर असून येथे दोन तसेच तीन बीएचके फ्लॅट उपलब्ध होतील. याच परिसरातील सहकार नगर भाग एकमधील १८ निवासी इमारतींबाबत गोदरेजने यापूर्वीच करार केला आहे.
ग्रामीण बँकांचा संप रद्द
देशभरातील ग्रामीण बँकांचा शनिवारचा (दि.३०) प्रस्तावित संप रद्द करण्यात आला आहे. विविध सहा मागण्यांसाठी हाक देण्यात आलेल्या या आंदोलनाबाबत नवी दिल्लीत गुरुवारी झालेल्या बैठकीत संप न करण्याच्या निर्णयावर ‘ऑल इंडिया रिजनल रुरल बँक एम्प्लॉईज असोसिएशन’ (एआयआरआरबीईए) मध्ये सहमती झाल्याचे संघटनेचे सरचिटणीस दिलिपकुमार मुखर्जी यांनी म्हटले आहे. करसंकलनासाठी राष्ट्रीयीकृत बँकांचे शुक्रवारपासून जादा तासांचे कामकाज सुरू झाले असताना देशभरातील विविध ६४ ग्रामीण बँकांच्या १७ हजारांहून शाखांमध्ये शनिवारी संप करण्याची भूमिका घेण्यात आली होती.
विक्रीकर विभागाला ‘गतिमानते’चा पुरस्कार
राज्याच्या विक्रीकर विभागाने ‘राजीव गांधी गतिमानता अभियान स्पर्धा २०११-१२’मध्ये बाजी मारली आहे. राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या अभियानाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात माजी विक्रीकर आयुक्त संजय भाटिया हे प्रतिष्ठेच्या रु. १० लाखांचा पुरस्काराचे मानकरी ठरले. विद्यमान विक्रीकर आयुक्त नितीन करीर यांनी आपल्या उमद्या अधिकारी वर्गासह हा मानाचा पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वीकारला.