देशातील सध्याच्या घडीला वाणिज्य वाहनांच्या खरेदीसाठी अर्थसाहाय्य करणारी सर्वात मोठी कंपनी श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनीने वेगळे व्यावसायिक वळण घेताना, नव्या व जुन्या खासगी प्रवासी वाहनांसाठी अर्थपुरवठय़ाच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. ‘श्रीराम ऑटो मॉल’ या संपूर्ण अंगीकृत उपकंपनीमार्फत सुरू झालेला हा व्यवसाय आगामी काळातील कंपनीचा सर्वाधिक वेगाने विकास पावणारा व फायद्यातील व्यावसायिक अंग असेल, असे कंपनीला अपेक्षित आहे.
वाणिज्य वाहनांसाठी निर्विवाद अग्रेसर अर्थपुरवठादार म्हणून असलेल्या जमेच्या बाजूतून या नव्या व्यवसायाने आकार घेतला आहे. ट्रक अथवा टेम्पोसाठी कर्ज घेतलेल्या ग्राहकांनीच दुचाकी अथवा कारचे स्वप्न साकारावे या उद्देशाने सहा महिन्यांपूर्वी या व्यवसायाला पाय फुटले आणि एवढय़ा कालावधीत त्याने ५० कोटी रुपयांची उलाढालही केली.
या उत्साहदायी सुरुवातीमुळेच पुढच्या सप्टेंबपर्यंत म्हणजे पहिल्या वर्षांत या व्यवसायातून १०० कोटींच्या उलाढालीचा आकडा गाठला जाईल, असे श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश रेवणकर यांनी सांगितले. पहिल्या सहा महिन्यात कारसाठी अर्थपुरवठा मिळविणाऱ्या ग्राहकांमध्ये २२ टक्के हे कंपनीचे विद्यमान ग्राहकच होते, अशीही त्यांनी माहिती दिली.
प्रत्येकी पाच ते सहा एकर क्षेत्रफळ असलेले आणि साधारण २५० अवजड वाणिज्य वाहने सामावून घेईल, अशा देशभरात ३१ ऑटो मॉल्सचे जाळेही ‘श्रीराम ऑटोमॉल इंडिया’ या उपकंपनीमार्फत रचण्यात आले असल्याचे रेवणकर यांनी सांगितले. पुढील दोन वर्षांत ही संख्या दुपटीने वाढून ६० वर नेण्याचे कंपनीचे नियोजन आहे.
महाराष्ट्रात औरंगाबाद, सोलापूर व पनवेल या ठिकाणी ऑटो मॉल्स थाटण्याचे कंपनीने प्रस्तावित केले आहे. या ठिकाणी वाणिज्य वाहनांबरोबरच, जुनी व वापरात असलेली प्रवासी वाहने व दुचाकींचीही विक्री केली जात आहे. प्रत्यक्ष ऑटो मॉलमध्ये येण्याऐवजी ऑनलाइन माध्यमांचाही ग्राहकांकडून उत्स्फूर्त वापर होत असून, दरमहा १० हजारांहून अधिक बुकिंग्जपूर्वी विचारणा या माध्यमांतून होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वापरात असलेल्या जुन्या कारच्या खरेदीदार आणि विक्रेते यांना ऑटो मॉल हा एकत्र आणणारा मंच आहेच, तर पसंतीची जुनी कार खरेदी करणाऱ्या त्याच ठिकाणी आवश्यक ते अर्थसाहाय्य आमच्याकडून प्रदान केले जाते. अशी सामायिक सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देणारी ऑटो मॉल ही पहिलीच संकल्पना असल्याचा त्यांनी दावा केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा