टाटा समूहाचे सहावे अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारणारे मिस्त्री हे टाटा कुटुंबाबाहेरील असलेले दुसरे अध्यक्ष ठरले आहेत. टाटा समूहाचे संस्थापक जमशेटजी टाटा यांच्या अध्यक्षपदानंतर त्यांचे पुत्र सर दारब आणि नातू जेआरडी तसेच खापर नातू रतन टाटा या कुटुंबातील सदस्यांनी समूहाची धुरा अध्यक्ष म्हणून वाहिली आहे. मात्र सर नौरोजी साकलातवाला यांच्यानंतर अध्यक्षपद सांभाळणारे सायरस मिस्त्री हे टाटा कुटुंबाबाहेरचे दुसरे अध्यक्ष ठरणार आहेत. जमशेटजींचा पहिला खरा वारसदार म्हणून मान प्राप्त करणारे जेआरडी टाटा यांनी १९३८ ते १९९१ पर्यंत अध्यक्षपदाची यशस्वी धुरा वाहिली. तर रतन टाटा यांनी त्यानंतर सलग २१ वर्षे हे अध्यक्षपद सार्थपणे सांभाळले. रतन टाटा यांनी वयाच्या ५४ व्या वर्षी टाटा समूहाच्या अध्यक्षपदाची सूत्रे जेआरडींकडून स्वीकारली होती. सायरस मिस्त्री यांच्याकडे ४४ व्या वर्षी हे पद आले आहे.
पुढय़ात आव्हाने; प्रतिमेचाही भार
अत्यंत बिकट स्थितीत रतन टाटा यांना नव्या वारसदाराकडे सूत्रे देण्याची वेळ आली असताना स्वत: सायरस मिस्त्री यांच्या पुढय़ात आव्हानांची जंत्री कायम आहे. शिवाय रतन टाटा यांची प्रतिमा जपण्याची कसरतही त्यांना करावी लागणार आहे. रतन टाटा यांच्यापुढे समूहापेक्षा मोठे होणाऱ्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांना बाजूला सारण्याचे अवघड कार्य करावे लागले; तर सायरस मिस्त्री यांना समूहात त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ असणाऱ्यांबरोबर समूहाचा गाडा हाकण्याची मोहिम पार पाडावी लागणार आहे. व्यक्तीपेक्षा उपकंपन्यांना अधिक विस्तारण्याकडे त्यांना कल ठेवावा लागेल. याचबरोबर राजकारण, उद्योग, प्रशासन या पातळ्यांवर रतन टाटा यांनी निभावलेल्या भूमिकेशी सामंजस्य वातावरण त्यांना आचरणात आणावे लागेल. टाटा यांच्यासारखा मितभाषी गुण मिस्त्री यांच्याकडे असला तरी बिकड प्रसंगातील सावध निर्णयक्षमतेचा त्यांचा गुण यापुढे पाहण्याची अपेक्षा निर्माण होऊ लागली आहे.
मोठा विचार करा, अशी शिकवण रतन टाटा यांनी समूहातील प्रत्येकाला नेहमीच दिली. त्यांनी सूत्रे हाती घेतली तेव्हा मला नाही वाटत समूह १० अब्ज डॉलरचाही असेल की नाही. पण आज त्याचा आकार १०० अब्ज डॉलर इतका झाला आहे. यातच सारे आले. तेथे संधी होती आणि त्यांनी ती घेतली.
– जे. जे. इराणी, माजी संचालक, टाटा सन्स.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा