नव्या वर्षांच्या सुरुवातीलाच देशांतर्गत प्रवासी कारची विक्री अवघ्या ३.१४ टक्क्य़ाने वाढण्याच्या रुपात या उद्योगासाठी उत्पादन शुल्क सवलत काढून घेतल्याचा परिणाम जाणवू लागला आहे. एकूण आर्थिक वर्षांत या उद्योगाला आता मोठय़ा प्रमाणातील वाहन विक्रीबाबत आशा राहिलेली नाही.
वाहन उत्पादकांची संघटना असलेल्या ‘सिआम’चे महासंचालक विष्णू माथूर यांनी तर जानेवारी २०१५ मधील अवघी ३ टक्के विक्री वाढ ही या उद्योगाची खरी पातळी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे एकूण आर्थिक वर्षांमध्ये या उद्योगाकडून मोठय़ा विक्रीची अपेक्षा करण्यात अर्थ नाही, असेच त्यांनी सुचविले आहे.
वाहन उद्योगावर आलेल्या या संकटाला जानेवारीपासून पूर्ववत करण्यात आलेले उत्पादन शुल्क जबाबदार असल्याचे आवर्जून सांगितले जाते.
डिसेंबरमध्ये वाहन उद्योगाने तब्बल दुहेरी आकडय़ात, १५.२६ टक्के वाढ नोंदविली होती. या महिन्यातील हेच प्रमाण चालू एकूण आर्थिक वर्षांतील सर्वाधिक राहणार असून वर्षांच्या उर्वरित कालावधीत विक्रीत लक्षणीय नोंद होण्याची आशा या उद्योगाला नाही.
जानेवारी २०१५ मध्ये १,६९,३०० एकूण प्रवासी कार विकल्या गेल्या आहेत. वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीतील १,६४,१४९ तुलनेत ते किरकोळ अधिक आहे. गेल्या महिन्यात मारुती सुझुकीने ७.९४ टक्के वाढ नोंदविली. तर ह्य़ुंदाई मोटर इंडियाने अवघी ३.८७ टक्के वाढ राखली आहे. होन्डाच्या कार विक्रीत १.७ टक्के घट झाली आहे. तर टाटा मोटर्सने यंदा उल्लेखनीय ३७.५ टक्के भर राखली आहे. महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्रूचीही विक्री या महिन्यात ३.५६ टक्क्य़ांनी घसरली आहे.

Story img Loader