देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेले व सर्वाधिक रोजगारप्रवण लघू व सूक्ष्मतम उद्योग तसेच स्वयंरोजगार करीत असलेल्यांना वित्तपुरवठा ही एक प्रमुख समस्या असून, त्यांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या ‘स्मॉल बिझनेस फायनान्सिंग कंपन्या (एसबीएफसी)’ना बँकांपेक्षा वेगळी वागणूक मिळण्याबरोबरच, स्वतंत्र नियामकाखाली त्यांच्या कार्याची चौकट आखून देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी अर्थमंत्री आणि संसदेच्या वित्तविषयक स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत सिन्हा यांनी येथे केले.
अंदाजे ४.२ कोटी कंपन्या, जवळजवळ ५०% उत्पादन, सुमारे १० कोटी लोकांना थेट रोजगार आणि देशाच्या निम्म्या निर्यातीत योगदान असूनही लघू व सूक्ष्मतम उद्योगांचा बँकांकडून होणाऱ्या वित्तपुरवठय़ात केवळ ३०% वाटा आहे, असे यशवंत सिन्हा यांनी खेदाने बोलताना सांगितले. लहान कंपन्यांसाठी अर्थपुरवठय़ाचे महत्त्व या  संकल्पनेवर इंडियन र्मचट्स चेंबरकडून आयोजित ‘प्रमोट इंडिया’ या एक दिवसाच्या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी सिन्हा बोलत होते. देशाला सर्वसमावेशक विकास साध्य करायचा असेल तर लहान कंपन्यांना वित्तीय ओघ खुला व्हायला हवा आणि त्यासाठी देशात ‘एसबीएफसीं’च्या वाढीला मोठा वाव मिळायला हवा, असे एस. गुरुमूर्ती यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले. चेंबरचे अध्यक्ष शैलेश वैद्य यांनीही एसबीएफसीच्या प्रोत्साहनाचे धोरण गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.

Story img Loader