माहिती महाजालातील शोधक साधन ‘गुगल’ने लघुउद्योगांसाठी उपयुक्त ‘गुगल माय बिझनेस (जीएमबी)’ या मोबाइल अ‍ॅपला मिळत असलेला उत्साही प्रतिसाद पाहता, २०१७ सालापर्यंत म्हणजे आगामी दोन वर्षांत ऑनलाइन कारभार करणाऱ्या भारतातील लघू व मध्यम उद्योगांची संख्या दोन कोटींवर नेण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे.
इंग्रजीसह हिंदी भाषेतून अगदी विनामूल्य आणि डोमेने नेम, वेबस्थळाची मालकी व सांभाळ यासाठी कोणतीही गुंतवणूक आपल्या सेवा व उत्पादनांची माहितीच्या प्रसाराची सोय ‘जीएमबी’ ने छोटय़ा उद्योगांसाठी करून दिली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात फैलावलेले हे उद्योग आणि ग्राहक यांच्यातील दुवा म्हणून काम करण्याचे गुगलने ठरविले आहे, असे गुगलचे दक्षिण पूर्व आशिया आणि भारताचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजन आनंदन यांनी येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. पुढील तीन वर्षांत भारतात नेटकरांची संख्या ५० कोटींच्या वर जाईल आणि इतकी प्रचंड मोठी बाजारपेठ या छोटय़ा उद्योगांना खुणावणारी ठरेल, असे ते म्हणाले.
गुगलने छोटय़ा उद्योगांसाठी ‘जीएमबी’ हे पहिलेच उत्पादन प्रस्तुत केले असून, पाच महिन्यांपूर्वीपासून त्याच्या सुरू असलेल्या प्रायोगिक वापरातच १० लाखांहून अधिक उद्योजकांकडून प्रतिसाद त्याने मिळविला आहे. दर आठवडय़ाला नवीन २५ हजार लघुउद्योजक या व्यासपीठावर अवतरत आहेत, असे आनंदन यांनी सांगितले.
आजच्या घडीला देशात ५.१ कोटींच्या घरात सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योजक कार्यरत आहेत. पण त्यापैकी केवळ पाच ते सहा टक्क्य़ांचा व्यावसायिक कारभार ऑनलाइन आहे, अशी माहिती आनंदन यांनी दिली.

Story img Loader