भारतीय उद्योग महासंघ अर्थात सीआयआयने अलीकडेच स्थापन केलेल्या ‘इंडियन वुमन नेटवर्क (आयडब्ल्यूएन)’ या व्यावसायिक आणि उद्योगधंद्यात करिअर करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी खास मंचाने ‘सेकंड इनिंग’ हा विशेष पाहणी अहवाल प्रकाशित केला आहे. सीआयआय-महाराष्ट्रच्या वार्षिक दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत शायना एनसी यांच्या हस्ते त्याचे अनावरण करण्यात आले. विवाह, गर्भधारणा, मुलांचे पालनपोषण यामुळे नोकरीत खंड पडलेल्या महिलांना पुन्हा नव्याने करिअर सुरू करताना येणाऱ्या अडचणींचा ऊहापोह करणाऱ्या या पाहणीतून, अशा महिलांना सेवेत सामावून घेण्याबाबत उद्योगक्षेत्राच्या दृष्टिकोन आणि अपेक्षांचीही मांडणी केली गेली आहे. नोकरी-करिअरमध्ये खंड पडण्याचे महिलांबाबत सर्वात मोठे ९० टक्के कारण हे विवाह आणि पालकत्व हे असून, १० वा त्यापेक्षा अधिक वर्षांचा अनुभव व पात्रता असूनही केवळ पाच टक्के महिलांना ब्रेकनंतर पुन्हा करिअर सुरू करण्याची संधी मिळत असल्याचे हा पाहणी अहवाल दर्शवितो. पाहणीत नोकरी सोडण्याचे लैंगिक छळणूक असे कारण सांगणाऱ्या महिलांचे प्रमाण दोन टक्के इतके आहे. ‘सीआयआय-आयडब्ल्यूएन’ करिअर पुन्हा नव्याने सुरू करण्यासाठी अशा महिलांसाठी विशेष प्रोत्साहनपर उपक्रम राबविला जाणार आहे.

Story img Loader