आशिया खंडावर व्यवसायविस्ताराचे लक्ष्य ठेवून कार्यरत ब्रिटिश मूळ असलेल्या स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने आर्थिक वर्षांच्या तिसऱ्या तिमाहीचे निराशाजनक निकाल जाहीर करताना, येथील आपले एकूण मनुष्यबळ तब्बल १५ हजारांनी कमी करीत असल्याची घोषणा केली. सलग नुकसान नोंदविणाऱ्या या बँकेने पुन्हा वृद्धिपथ गाठण्यासाठी हे आवश्यक असल्याचे नमूद केले आणि ५.१ अब्ज अमेरिकी डॉलरचे भांडवल उभारत असल्याचे स्पष्ट केले.
स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने कात टाकत, संरचनात्मक पुनर्रचना हाती घेतली असून, नोकरकपात ही त्याच आराखडय़ाचा एक भाग आहे. एकूण पुनर्रचनेवर बँकेकडे ३ अब्ज डॉलर खर्ची पडणार आहेत. याव्यतिरिक्त नोकरकपातीबाबत अन्य काहीही तपशील बँकेच्या प्रवक्त्यांनी देण्यास इन्कार केला. तथापि ज्यांना नोकऱ्या गमवाव्या लागणार आहेत त्यांना भत्ता या स्वरूपात नियोजित ३ अब्ज डॉलर खर्चाचा निम्मा हिस्सा वापरात येईल, अशी शक्यता त्यांनी बोलून दाखविली.
स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने सरलेल्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत १३९० लक्ष डॉलरचा तोटा नोंदविला आहे. अनेकांसाठी ही बाब धक्कादायक ठरली असून, गेल्या वर्षी याच तिमाहीत बँकेने १.५३ अब्ज डॉलरचा नफा कमावला होता. बँकेचे समूह मुख्याधिकारी बिल विंटर्स यांनी या तिमाही कामगिरीचे ‘निराशाजनक’ असे वर्णन केले. बँकेच्या भागधारकांनी जूनमध्ये ओरड सुरू केल्यानंतर तत्कालीन मुख्याधिकारी पीटर सँड्स यांची उचलबांगडी होऊन विंटर्स यांनी सूत्रे हाती घेतली आहेत.
बँकेने सरलेल्या जानेवारीमध्ये चालू वर्षांत जगभरातील बँकेच्या पसाऱ्यातून २००० कर्मचाऱ्यांना नारळ दिला जाईल, असे म्हटले होते. त्या वेळी यातून बँकेला वार्षिक ४० कोटी अमेरिकी डॉलरची बचत करणे शक्य असल्याचे सांगितले गेले होते. प्रत्यक्षात आता नोकरकपातीचा आकडा १५,००० पर्यंत फुगला असल्याचे स्पष्ट होत आहे.
भारतातही सर्वाधिक शाखाविस्तार असलेली विदेशी बँक म्हणून स्टँडर्ड चार्टर्ड बँकेचे अस्तित्व आहे. भारतातून प्रत्यक्ष नोकरकपातीचे प्रमाण किती असेल, याचा तपशील अधिकृतपणे जाहीर केला गेलेला नाही.

Story img Loader