भारतातील कररचनेच्या स्थिरतेबाबत विदेशी गुंतवणूकदारांना आश्वस्त करणाऱ्या केंद्रीय अर्थमंत्र्यांनी कर संकलन करणाऱ्या अधिकाऱ्यांना मात्र जोमाने कामाला लागण्यास सांगितले आहे. चालू आर्थिक वर्षांतील उर्वरित कालावधीत अर्थसंकल्पीय उद्दिष्ट साधण्यासाठी करसंकलकांनी प्रयत्नरत व्हावे, असा सल्ला पी. चिदंबरम यांनी दिला. आर्थिक वर्ष संपण्यास दीड महिन्याचा तसेच नवीन वर्षांचा अर्थसंकल्प सादर होण्यास पंधरवडाही शिल्लक नसताना त्यांनी केलेल्या या आवाहनाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
केंद्रीय उत्पादन आणि सीमाशुल्क मंडळाच्या अधिकाऱ्यांना मंगळवारी राजधानीत अर्थमंत्र्यांनी संबोधित केले. यावेळी यंदाचे वर्ष हे करसंकलनासाठी बिकट वर्ष असल्याचा उल्लेख त्यांनी केला. संथ अर्थव्यवस्था, कमी आयात, अल्प निर्मिती या बाबी कर संकलनावर विपरित परिणाम करीत असल्याचे नमूद करून चिदंबरम यांनी अर्थसंकल्पातील कर संकलनाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. कर प्रशासनात सुधारणा आणण्याच्या दृष्टीने अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा, असेही त्यांनी सुचविले. करदाता आणि कर संकलन अधिकारी यांच्यात शत्रुत्त्वाचे नाते नाही, यावर करदात्याला जेव्हा विश्वास बसेल तेव्हाच अधिकाधिक लोक कर कायद्याच्या अखत्यारित येतील, असा धडाही त्यांनी यावेळी दिला.
सरकारने २०१२-१३ साठी अर्थसंकल्पात ५.०५ लाख कोटी रुपयांच्या अप्रत्यक्ष कराचे लक्ष्य ठेवले आहे. अप्रत्यक्ष करांमध्ये उत्पादन, सीमाशुल्क आणि सेवा करांचा अंतर्भाव होतो. एप्रिल ते नोव्हेंबर २०१२ दरम्यान ते १६.८ टक्क्यांनी वधारून २.९२ लाख कोटी रुपये झाले आहे. या दरम्यान उत्पादन शुल्क १.०८ लाख कोटी, सीमाशुल्क १.०४ लाख कोटी आणि सेवा कर ७८,७७४ कोटी रुपये जमा झाला आहे. आधीच वित्तीय तुटीची चिंता त्यात उद्योगधंद्यांची बिकट स्थिती, कंपनी हालचालींमुळे आर्थिक वर्षांतील कर उद्दीष्ट गाठणे कठीण असल्याचे सूतोवाच सरकारतर्फे नोव्हेंबर २०१२ मध्येच करण्यात आले होते.

Story img Loader