* रिझव्‍‌र्ह बँकेच्या उसंत-धोरणाचे पडसाद * अन्य बँकांकडूनही लवकरच अनुकरण
रिझव्‍‌र्ह बँकेच्या स्थिर व्याजदर पतधोरणाचे परिणाम प्रत्यक्ष बँकिंग क्षेत्रावर लगेचच दिसून येऊ लागले आहेत. कर्जदारांना याचा थेट लाभ होण्याच्या दृष्टीने भारतीय स्टेट बँक व एचडीएफसीने गुरुवारी गृहकर्ज व्याजदर अध्र्या टक्क्यापर्यंत कमी केले. व्याजदर कपातीचे हे पालुपद अन्य बँकांसाठीही कायम राहण्याची शक्यता आहे.
देशातील सर्वात मोठय़ा सार्वजनिक स्टेट बँकेने तिचे गृहकर्ज व्याजदर ०.३५ टक्क्यांपर्यंत कमी केले आहेत. शुक्रवारपासूनच लागू होणारे हे दर केवळ नव्या कर्जदारांसाठीच असेल. महिला कर्जदारांना मात्र अतिरिक्त ०.०५ टक्क्याची सवलत मिळेल. यानुसार ७५ लाख रुपयेपर्यंतच्या नव्या कर्जदारांसाठी व्याजाचा दर वार्षिक १०.१५ टक्के असेल, तर महिलांना तो १०.१० टक्के लागू होईल. विद्यमान कर्जदारांचा व्याजदर १०.५० टक्के आहे. ७५ लाख रुपयांवरील कर्जासाठी नवा व्याजदर १०.३० टक्के असेल. याच रकमेसाठी महिला कर्जदारांना तो १०.२५ टक्के असेल. यामुळे कर्जदारांचा मासिक हप्ताही बदलला आहे. सध्याच्या कर्जदारांना ३० वर्षे मुदतीसाठी प्रत्येक लाखामागे प्रति माह ९०० रुपये हप्ता भरावा लागतो. नव्या रचनेनुसार ३० वर्षे कालावधीसाठी महिलांना प्रति लाख महिन्याला ८८५ रुपये तर इतरांना ८८९ रुपये हप्ता बसेल.
खासगी गृहवित्त कंपनी असलेल्या एचडीएफसी बँकेनेही गुरुवारी गृहकर्ज व्याजदर ०.२५ टक्क्यापर्यंत कमी केले. असे करताना कंपनीने केवळ ३१ जानेवारीपर्यंतची मुदत दिली आहे. ‘विन्टर बोनान्झा’च्या योजनेखाली कंपनीने ३१ जानेवारीपूर्वी कर्ज घेणाऱ्यांना वार्षिक १०.२५ टक्के व्याजदर देऊ केला आहे. २० डिसेंबरपासून ही योजना लागू होत असून ७५ लाख रुपयेपर्यंतच्या कर्ज याअंतर्गत उचलता येणार आहे.
स्टेट बँक व एचडीएफसी दोहोंनी यासाठी ३० लाख रुपयेपर्यंतच्या कर्जाचा टप्पा ७५ लाख रुपयेपर्यंत विस्तारला आहे. आता ७५ लाख रुपयांच्या आत व ७५ लाख रुपयांच्या वर असे दोनच टप्पे यासाठी लागू असतील. स्टेट बँकेची व्याजदर कपात नव्या कर्जदारांसाठी लागू आहे तर एचडीएफसीने ३१ जानेवारीपर्यंत मुदत देऊ केली आहे.
स्टेट बँकेने ऑक्टोबरमध्येही व्याजदर सवलत घोषित केली होती. याद्वारे गृह तसेच वाहन, ग्राहकोपयोगी वस्तू कर्ज व्याजदर कमी करण्यात आले होते. सण समारंभाच्या सुरुवातीच्या या कालावधीत एचडीएफसीनेही पाव टक्के व्याजदर कपातीची  केली होती. ही योजना गेल्याच आठवडय़ात संपुष्टात आली असतानाच कंपनीने या योजनेव्यतिरिक्तच्या कर्जदारांसाठी डिसेंबरच्या सुरुवातीला ०.१० टक्क्याने व्याजदर वाढविले होते.

Story img Loader