भांडवली पूर्ततेचा पाया १३ टक्क्यांवर जाईल यासाठी आवश्यक रु. ४००० कोटींची भांडवल गुंतवणूक सरकारकडून चालू आर्थिक वर्षांतच केली जाईल, असा विश्वास बँकिंग अग्रणी भारतीय स्टेट बँकेने व्यक्त केला आहे.
सरकारकडून हे अर्थसहाय्य कोणत्या स्वरूपात येईल याबाबत आताच निश्चित काही सांगता येणार नाही, परंतु भागभांडवलात भर घालणारी ही ४००० कोटी रुपयांची मदत लवकरच मिळेल, अशी आशा स्टेट बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य वित्तीय अधिकारी दिवाकर गुप्ता यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. प्राइसवॉटरकूपर्स या लेखा संस्थेने आयोजित केलेल्या ‘सीएफओ समीट’ या परिषदेच्या समयी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
भांडवली पूर्ततेचे प्रमाण १३ टक्क्यांवर नेण्यासाठी ४००० कोटी रुपयांची भांडवलात वाढ पुरेशी असल्याचे गुप्ता यांनी स्पष्ट केले. भांडवली पूर्तता प्रमाण (सीएआर) हे बँकेच्या वित्तीय समर्थतेचे एक महत्त्वाचा निर्देशक असून, बँकेकडून वितरीत कर्जाचे बँकेच्या भागभांडवलाशी असलेले गुणोत्तर त्यातून दर्शविले जाते. स्टेट बँकेकडून वितरीत कर्जे ज्या प्रमाणात वाढत आहेत, त्या प्रमाणात भांडवलात भर न पडल्याने, भांडवली पूर्ततेचे प्रमाणे सप्टेंबर २०११ अखेर तर ते ११.४ टक्के इतके घसरले होते. चालू आर्थिक वर्षांत सप्टेंबर तिमाहीअखेर ते काहीसे सावरून १२.६३ टक्क्यांपर्यंत आले. पण या दरम्यान स्टँडर्ड अॅण्ड पूअर्स या जागतिक पतमानांकन संस्थेकडून भारताच्या या बँकिंग सम्राज्ञीला मानांकन खालावले गेल्याचा धक्का सोसावा लागला.
एकीकडे कर्ज वितरणाला लागलेली ओहोटी आणि कर्ज-थकीताचे भयानक वाढलेले प्रमाण या संकटाशी झुंजत असलेल्या स्टेट बँकेला केंद्र सरकारने चालू वर्षांच्या अर्थसंकल्पात १५,८०० कोटी रुपयांचे पुनर्वित्त देण्याची तरतूद केली आहे. परंतु सध्या पुरती बँकेची गरज ही ४,००० कोटी रुपयांची असल्याचे दिवाकर गुप्ता यांनी स्पष्ट केले आहे. त्या आधीच्या आर्थिक वर्षांत स्टँडर्ड अॅण्ड पूअर्सकडून मानांकन खाली आणले गेल्यानंतर, सरकारकडून ८००० कोटी रुपयांचे भांडवल बँकेत ओतले गेले होते. सरलेल्या जुलै-सप्टेंबर २०१२ तिमाहीत स्टेट बँकेने आधीच्या वर्षांच्या तुलनेत तब्बल ३० टक्के वाढ दर्शविणाऱ्या रु. ३,६५८.१४ कोटींचा विक्रमी निव्वळ नफा कमावला. पण त्याचवेळी तब्बल ५.१५ टक्क्यांपर्यंत वाढलेली बँकेची अनुत्पादीत कर्ज मालमत्ता (एनपीए) ही चिंतेची बाब बनून पुढे आल्याचेही दिसून आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा