स्टेट बँकेने घरांसाठीच्या कर्जावरील व्याजाच्या दरात ०.०५ टक्के ते ०.१५ टक्क्यांची कपात लागू केली आहे. देशातील ही एक अग्रणी बँक असल्याने अन्य वाणिज्य बँकांकडून या गृहकर्ज स्वस्ताईचे अनुकरण केले जाणे अपेक्षित आहे.
लक्षणीय म्हणजे स्टेट बँकेने ७५ लाखांपेक्षा अधिक रकमेच्या गृहकर्जाची स्वतंत्र वर्गवारी व त्यासाठी वेगळा व्याजदर आकारण्याची पद्धत संपुष्टात आणली आहे. सरसकट सर्व प्रकारच्या व कोणत्याही रकमेच्या गृहकर्जासाठी एक सारखाच व्याजाचा दर येत्या २६ ऑगस्ट २०१४ पासून बँकेने लागू केला आहे. बँकेकडे नव्याने गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकाला आता १०.१५ टक्के व्याजदराने कर्ज मिळू शकेल. जे यापूर्वी ७५ लाख रुपयांच्या कर्जासाठी १०.१५ टक्के इतकेच होते, तर ७५ लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या कर्जासाठी १०.३० टक्के असे होते. त्यामुळे व्याजदर कपातीचा सर्वाधिक दिलासा हा मोठय़ा रकमेच्या कर्जदारांनाच मिळणार आहे.
तथापि गेल्या वर्षी डिसेंबरपासून स्टेट बँकेने घरासाठी कर्ज घेणाऱ्या महिला ग्राहकांसाठी (एकल अथवा पती-पत्नी संयुक्त प्रस्तावात प्रथम अर्जदार असणाऱ्या महिलांसाठी) विशेष १०.१० टक्क्यांचा व्याजदर लागू केला होता. पुरुष ग्राहकांच्या तुलनेत महिला ग्राहकांना ०.०५ टक्क्यांची सवलत नव्या सुधारणेतही कायम राहिली आहे. परंतु या ठिकाणीही ७५ लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचे कर्ज घेणाऱ्या महिला ग्राहकांना पूर्वी १०.२५ टक्केदराने जे कर्ज  मिळत होते, ते आता १०.१० टक्के दराने मिळणार आहे.

Story img Loader