मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँकेने निधी खर्चावर आधारित कर्ज व्याजदरात (एमसीएलआर) ०.१० टक्के वाढ करण्याचा शुक्रवारी निर्णय घेतला. त्यामुळे स्टेट बँकेच्या नव्या ग्राहकांना कर्जावर अधिक व्याज द्यावे लागणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १५ जुलैपासून सुरू करण्यात आली असल्याचे बँकेतर्फे स्पष्ट करण्यात आले. बँकेकडून जून महिन्यातदेखील कर्जाच्या व्याजदरात वाढ करण्यात आली होती.
स्टेट बँकेच्या या निर्णयामुळे गृह कर्ज, वाहन कर्ज, व्यवसाय कर्ज आणि वैयक्तिक कर्जाचे दरदेखील वाढणार आहेत. ‘एमसीएलआर’वर आधारित एक वर्ष मुदतीच्या कर्जावरील व्याजदर आता ७.४० टक्क्यांवरून वाढून ७.५० टक्क्यांवर गेला आहे. याचप्रमाणे एक महिना, तीन महिने, सहा महिने ते तीन वर्षे मुदतीच्या कर्ज व्याजदरातही ०.१० टक्के वाढ करण्यात आली आहे. रिझव्र्ह बँकेच्या पुढील महिन्यात २ ते ४ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या आगामी पतधोरण आढाव्यात व्याजदरामध्ये वाढ केली जाण्याची शक्यता आहे. त्याआधीच स्टेट बँकेने कर्जाच्या दरात वाढ केली आहे.
ठेवी दरातही वाढ बँकेने कर्ज महाग करतानाच विविध मुदतीच्या मोठय़ा रकमेच्या ठेवींवरील व्याजदरातही वाढ केली आहे. बँकेने दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या मुदत ठेवींवरील दरात अर्ध्या टक्क्याची म्हणजेच ५० आधार बिदूंनी वाढ केली आहे. एक वर्ष ते दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींवर आता ५.२५ टक्के दराने व्याज मिळेल. या आधी त्यावर ४.७५ टक्के दराने व्याज दिले जात होते. तसेच दोन वर्ष ते तीन वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवर ४.२५ टक्के आणि तीन वर्ष आणि १० वर्षांपर्यंतच्या ठेवींवर ४.५० टक्के दराने व्याज मिळेल. नव्याने करण्यात येणाऱ्या मुदत ठेवींवर सुधारित व्याजदर लागू असेल.