बँकेचे कर्जव्यवहार आणि अधिकृत स्रोतातून उपलब्ध अर्थविषयक माहिती या आधाराने देशाच्या आर्थिक प्रगतीविषयक सूचक असा ‘एसबीआय कम्पोझिट इंडेक्स’ सुरू करण्यात बँकिंग अग्रणी स्टेट बँकेने पुढाकार घेतला आहे. दरमहा माहिती संकलित करून त्यानुसार फेर धरणारा हा सर्वसमावेशक निर्देशांक देशातील उत्पादन क्षेत्रातील हालचालींचा आरसा असेल, असा विश्वास स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी मंगळवारी या निर्देशांकाच्या अनावरणप्रसंगी व्यक्त केला. आर्थिक-औद्योगिक धोरणकर्ते, गुंतवणूकदार, बाजारातील सर्व सहभागी भागीदार यांना उत्पादन क्षेत्रातील वळणे आणि कल यांचा खूप आधी चाहूल देणारा असेल.
 या निर्देशांकाचे मापन शून्य ते १०० अशा पल्ल्यात केले जाणार आहे. निर्देशांक ५० अंशांपुढे राहिल्यास, आधीच्या महिन्याच्या तुलनेत त्यात वाढ झाली आणि ५० अंशांपेक्षा खाली आल्यास त्यात घसरण झाली असा संकेत दर्शविला जाईल.