कर्मचाऱ्यांचे वेतन आणि निवृत्तीवेतनावर मोठा खर्च करावे लागणाऱ्या देशातील सर्वात मोठय़ा सार्वजनिक स्टेट बँकेने आगामी कालावधीत धीम्या गतीने कर्मचारी भरतीचे पाऊल उचण्याचे ठरविले आहे. बँक विद्यमान कर्मचारी संख्येसह समाधानी असून पुढील काही कालावधीतही फार मोठय़ा प्रमाणात भरती होणार नाही, असे बँकेने स्पष्ट केले आहे.
बँकेचे व्यवस्थापकीय संचालक ए. कृष्ण कुमार यांनी येथे सांगितले की, बँकेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण पाहूनच नव्या भरतीबाबत निर्णय घेतला जाईल. तूर्त तरी नवी भरती करण्याऐवजी ती आणखी दोन ते तीन वर्षे लांबणीवरही टाकली जाऊ शकते. कर्मचारी अचानक कमी करून कार्यक्षमता येणे शक्य नाही; म्हणून आणखी कर्मचारीही घेणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सध्या बँकेत असणारे २.२३ लाख मनुष्यबळ मार्च २०१४ अखेर २.२० लाख होण्याची शक्यता आहे. एप्रिल ते डिसेंबर २०१३ दरम्यान बँकेतून ५,००० कर्मचारी कमी झाले आहेत. यासाठी बँकेचा कर्मचाऱ्यांचे वेतन आदींवर होणारा खर्च गेल्या वर्षभरात ३५ टक्क्यांनी वाढून तो १७,२२५ कोटी रुपयांवर गेला आहे.
कर्मचारीनिहाय उत्पादनक्षमता आणि खर्च हे मुद्दे लक्षात घेतले तर बँक मनुष्यबळ वाढविण्याच्या स्थितीत नाही, असेही कृष्ण कुमार यांनी म्हटले आहे.
रिझव्र्ह बँकेच्या गेल्या वर्षांच्या अहवालातही स्टेट बँक ही प्रति कर्मचारी व्यवसाय आणि नफ्याबाबत राष्ट्रीय सरासरीच्या खूपच खाली असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे. २०१२-१३ मध्ये बँकेचा प्रति कर्मचारी व्यवसाय ९.४३ कोटी रुपये नोंदला गेला आहे. एकूण बँक क्षेत्राचे हे प्रमाण १२.१३ कोटी रुपये आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा