सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या स्टेट बँकेनं आपल्या एमएलसीआरवर आधारित कर्जावरील व्याजदरात १५ बेसिस पॉईंट्सची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक कालावधीच्या कर्जावर ही कपात लागू होणार आहे. या कपातीनंतर कर्जावरील व्याजदर ७.४० टक्क्यांवरून ७.२५ टक्क्यांवर आले आहे आहे. हे नवे व्याजदर १० मे पासून लागू होणार आहेत. सलग १२ वेळा कर्जावरील व्याजदरात कपात करण्यात आल्याचं स्टेट बँकेकडन सांगण्यात आलं. तर लॉकडाउनच्या कालावधीत सलग तिसऱ्यांदा स्टेट बँकेनं ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
एकीकडे कर्जावरील व्याजदर कमी केले असले तरी दुसरीकडे मात्र बँकेनं टर्म डिपॉझिटवरील व्याज दरातही कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरील व्याजदरात २० बेसिस पॉईंट्सची कपात करण्यात आली आहे. हे नवे दर १२ मे पासून लागू होणार असून ते पुढील तीन वर्षांसाठी लागू असणार आहेत.
ज्येष्ठ नागरिकांसाठी बँकेनं ‘एसबीआय वी केअर डिपॉझिट’ या नव्या योजनेची सुरूवात केली आहे. या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांनी ५ वर्षे किंवा त्यापेक्षा पुढील कालावधीसाठी पैसे जमा केल्यास त्यांना अतिरिक्त ३० बेसिस पॉईंट्सचा फायदा देण्यात येणार आहे. ३० सप्टेंबर २०२० पर्यंत ही नवी योजना सुरू राहणार आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रचीही व्याज दरात कपात
बँक ऑफ महाराष्ट्र आणि इंडियन ओव्हरसीज बँकेनं ६ मे रोजी कर्जाच्या व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही बँकांनी व्याज दरात १० बेसिस पॉईंट्सची कपात केली होती. इंडियन ओव्हरसीज बँकेनं एका वर्षाच्या कालावधीसाठी असलेल्या कर्जाच्या व्याजदरात ०.१० टक्क्यांची कपात करून तो ८.१५ टक्के केला होता. तर बँक ऑफ महाराष्ट्रानं एमएलसीआरवर आधारीत व्याज दरात ०.१० टक्क्यांची कपात करून तो ७.९० टक्के केला आहे.