बँकिंग अग्रणी स्टेट बँकेला अनुत्पादित कर्जाचे (एनपीए) प्रमाण स्थिर राखण्यात यश आले आहे. सुस्थिर पतगुणवत्ता राखण्याबरोबरच, बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी कर्जथकिताच्या प्रवृत्तीविरुद्ध कठोर पाऊल टाकण्याचे केलेले विधान हे स्टेट बँकेच्या शुक्रवारी जाहीर झालेल्या तिमाही निकालाचे वैशिष्टय़ राहिले. परिणामी, भांडवली बाजारात स्टेट बँकेच्या समभागाने ७.७ टक्क्यांची उसळी घेत, सेन्सेक्स निर्देशांकातील सर्वोत्तम झेप घेणारा समभाग म्हणून आघाडी मिळविली.
डिसेंबरअखेर संपलेल्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करणाऱ्या बहुतांश सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या अनुत्पादित कर्जाचे (एनपीए) व त्यापोटी कराव्या लागणाऱ्या तरतुदींचे प्रमाण लक्षणीय वाढले असताना, स्टेट बँकेच्या बाबतीत हे प्रमाण किंचित म्हणजे, दुसऱ्या तिमाहीतील ४.८९ टक्क्यांवरून, डिसेंबरअखेर ४.९० टक्के असे वाढले आहे. हे प्रमाण यापेक्षा खूप अधिक राहण्याचे विश्लेषकांनी व्यक्त केलेले कयास स्टेट बँकेने निकालानंतर खोटे ठरविले.
बँकेने सरलेल्या तिमाहीत २९१० कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. जो आधीच्या वर्षांतील तिसऱ्या तिमाहीतील २२३४ कोटी रुपयांच्या तुलनेत ३०.६ टक्क्यांनी वाढला आहे.
तथापि, बँकेचा कर्जथकिताच्या समस्येबद्दलचा दृढ निर्धार शेअर बाजार आणि गुंतवणूकदारांच्या दृष्टीने खास दखलपात्र ठरला. परिणामी, स्टेट बँकेच्या समभागाने शुक्रवारचे व्यवहार संपत असताना ७.९६ टक्क्यांनी उसळी घेत ३०७.०५ वर विश्राम घेतला. दिवसभराच्या व्यवहारात समभागाने २८५.५० या नीचांकावरून ही मजल मारली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लिलावाद्वारे कर्जवसुली
अनुत्पादित कर्जे कोणत्याही जादूच्या छडीने कमी झाली नसून, त्यामागे कर्मचाऱ्यांची मेहनत कामी आली आहे, असे स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी निकालानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. प्रत्येक अनुत्पादित कर्जाची जबाबदारी एका अधिकाऱ्यावर निश्चित करण्यात आली आहे. आडमुठय़ा थकबाकीदारांच्या बँकेकडे तारण असलेल्या १२०० कोटी किमतीच्या मालमत्ता निश्चित करण्यात आल्या असून, येत्या ३१ मार्चपर्यंत त्यांचा लिलाव करून थकबाकी वसूल करण्याची योजना बँकेने बनवली असल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले.