बँकिंग अग्रणी स्टेट बँकेवर वाढत्या अनुत्पादित कर्जाचा भार असह्य झाल्याचे जाणवत असून व्याजावरील उत्पन्नही कमी झाल्यामुळे बँकेला गेल्या दोन वर्षांत प्रथमच तिमाही नफ्यातील घसरणीचा सामना करावा लागला आहे. २०१२-१३ या आर्थिक वर्षांतील एकूण नफा २० टक्क्यांनी वधारला असला तरी जानेवारी ते मार्च २०१३ या तिमाहीतील नफा १८.५४ टक्क्यांनी कमी झाला आहे. याचा परिणाम भांडवली बाजारावरही होऊन बँकेचा समभाग ८ टक्क्यांनी आपटला. शिवाय बाजारमूल्यही १३ हजार कोटी रुपयांनी रोडावले.
आर्थिक वर्ष २०१२-१३ चे वित्तीय निष्कर्ष बँकेने गुरुवारी दुपारी भांडवली बाजाराचे कामकाज सुरू असतानाच जाहीर केले. स्टेट बँकेला आर्थिक वर्षांत १४,१०५ कोटी रुपये असा वधारता नफा झाला आहे. मात्र अनुत्पादक मालमत्तेसाठी करावी लागलेली मोठय़ा प्रमाणातील तरतूद आणि त्यातच व्याजावरील उत्पन्नही घसरल्याने या वर्षांच्या पहिल्या तिमाहीतील नफा मात्र दुहेरी आकडय़ाने खाली येत तो ३,२९९ कोटी रुपयांवर आला आहे.
जानेवारी ते मार्च २०१२ दरम्यान बँकेने ४,०५०.२७ कोटी रुपये नफा कमाविला होता. तर जानेवारी ते मार्च या गेल्या आर्थिक वर्षांच्या शेवटच्या तिमाहीत बँकेची अनुत्पादक कर्जे ८,६६९ कोटी रुपयांवर पोहोचली आहेत. या कालावधीत बँकेला यापोटी ५,८६८ कोटी रुपयांची तरतूद करावी लागली आहे.
बँकेचे यंदाच्या तिमाहीत व्याजातून येणारे उत्पन्नही ४.४२ टक्क्यांनी घसरून ११,५९१ कोटी रुपये झाले आहे. तर बुडित कर्जाचे प्रमाण (अनुत्पादित मालमत्ता) वर्षभरापूर्वीच्या ४.४४ टक्क्यांवरून थेट ४.७५ टक्क्यांवर झेपावले आहे.
भारतीय स्टेट बँकेच्या अन्य पाच सहयोगी बँकांचा गेल्या आर्थिक वर्षांतील एकूण निव्वळ नफा वधारून ३,६७८ कोटी रुपये झाला आहे.
बँकेचे कर्जवाटप १०.४६ लाख कोटी रुपयांवर गेले असून ठेवी १२.०३ लाख कोटी रुपये झाल्या आहेत. बँकेने मार्च २०१३ अखेर संपणाऱ्या एकूण आर्थिक वर्षांसाठी समभागावर ४१.५० टक्के लाभांश देऊ केला आहे.
स्टेट बँकेच्या तिमाही नफ्यात दोन वर्षांत पहिल्यांदाच घसरण
बँकिंग अग्रणी स्टेट बँकेवर वाढत्या अनुत्पादित कर्जाचा भार असह्य झाल्याचे जाणवत असून व्याजावरील उत्पन्नही कमी झाल्यामुळे बँकेला गेल्या दोन वर्षांत प्रथमच तिमाही नफ्यातील घसरणीचा सामना करावा लागला आहे. २०१२-१३ या आर्थिक वर्षांतील एकूण नफा २० टक्क्यांनी वधारला असला तरी जानेवारी ते मार्च २०१३ या तिमाहीतील नफा १८.५४ टक्क्यांनी कमी झाला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 24-05-2013 at 12:12 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State bank of india q4 net profit falls shares drop