वाढत्या बुडित कर्जाचा सामना करावे लागणाऱ्या देशातील सर्वात मोठय़ा सार्वजनिक बँकेने तिची सुमारे ५,००० कोटी रुपयांची अनुत्पादक मालमत्ता विकण्याचा निर्णय घेतला आहे. स्टेट बँकेच्या दोनशे वर्षांच्या इतिहासात प्रथमच हे घडले आहे. यानुसार बँक तिच्या एकूण ६७,७९९ कोटी रुपयांपैकी ५,००० कोटी रुपयांचे बुडित कर्ज मालमत्ता पुर्नबांधणी कंपन्यांना विकून ही रक्कम वसूल करेल.

भारतीय स्टेट बँकेने डिसेंबर २०१३ अखेर संपलेल्या तिमाहीत ५.७३ टक्के बुडित कर्जाची नोंद केली आहे. या कालावधीत बँकेचे बुडित कर्जे ११,४०० कोटी रुपयांनी वधारले आहे. वर्षभरात बँकेच्या अनुत्पादक मालमत्तेचे प्रमाण २ टक्क्य़ांवरून थेट ५ टक्क्य़ांपुढे गेले आहे. बँकेचे एकूण कर्ज वितरण ११.८३ कोटी रुपये आहे. बँकेचा कर्जे विक्रीचा व्यवहार ३१ मार्च २०१४ अखेर पूर्ण होण्याची शक्यता आहे. बँकेने अद्याप मालमत्ता पुर्नबांधणी कंपन्यांची नावे मात्र जाहिर केलेली नाहीत. बुडित कर्जे वसूल करण्याबाबतची नियमावली बँक पुढील आर्थिक वर्षांपासून अधिक कडक करण्याच्या तयारीत असतानाच मावळत्या वर्षांत ही घडामोड घडत आहे. याबाबतचे संकेत बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी नुकतेच दिले होते.
देशातील मालमत्ता पुर्नबांधणी कंपन्यांची संख्या १४ आहे. त्यापैकी अनेकांना स्टेट बँक पाचारण करण्याची शक्यता आहे. यासाठीची प्रक्रिया ही निविदा पद्धतीने राबविली जाऊ शकते. जो जास्त रकमेची निविदा भरेल त्या कंपनीला हे कर्ज विकून रक्कम वसूल केली जाईल. कंपन्या यासाठी बँकेकडून बुडित कर्जाच्या ५ ते १० टक्के अधिक रक्कम देऊन ते खरेदी करतील.  प्रामुख्याने देशातील सार्वजनिक बँका ४३,००० कोटी रुपयांचे बुडित कर्जे कंपन्यांना विकण्याच्या तयारीत असल्याचे समजते. हे प्रमाण एकूण अनुत्पादक मालमत्तांच्या तुलनेत ४.१ टक्के आहे.