दर तिमाहीला आणि गरज पडेल तेव्हा सहर्ष वर्तमानपत्र आणि वृत्त-वाहिन्यांचे प्रतिनिधी, विश्लेषकांपुढे मूद्देसूद भूमिका आणि स्पष्टीकरण घेऊन प्रस्तुत होणारे देशातील सर्वात बडय़ा-भारतीय स्टेट बँकेचे स्वेच्छेने प्रवक्तेपद भूषविणारे दिवाकर गुप्ता आपल्या ३६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून बुधवारी निवृत्त होत आहेत. या मोठय़ा सेवाकाळात बँकेत अनेक महत्त्वाची पदे भूषविलेले गुप्ता हे निवृत्तीसमयी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून कार्यरत होते.
गुप्ता यांच्या स्टेट बँकेच्या ३६ वर्षांच्या कार्यकाळात उप-व्यवस्थापकीय संचालक (नॅशनल बँकिंग), मुख्य महाव्यवस्थापक स्टेट बँक ऑफ पतियाळा, स्टेट बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक मुंबई विभाग, महाव्यवस्थापक (मनुष्यबळ व संस्थात्मक बदल), मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, स्टेट बँकेच्या पॅरिस शाखेचे प्रमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी एसबीआय कार्डस् अँड पेमेंटस असा प्रवास राहिला आहे. मार्च-डिसेंबर २०१० दरम्यान उप व्यवस्थापकीय संचालक (ग्रामीण बँकिंग) या पदाचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे होता. मागील दोन वष्रे त्यांच्याकडे वेळोवेळी असलेल्या कार्यभाराव्यतिरिक्त स्टेट बँकेचे प्रवक्तेपदही आले होते. तिमाही निकालांनंतर विश्लेषक, वृत्तसंस्थाचे, वृत्त-वाहिन्या आणि वर्तमानपात्रांचे प्रतिनिधी यांच्या प्रत्येक प्रश्नाला मुद्देसूद उत्तर देणे ही त्यांची खासियत होती. प्रश्नाला प्रतिप्रश्न करीत प्रश्नालाच बगल देणे, उत्तर देण्याचे टाळणे त्यांनी कधी केले नाही. स्टेट बँकेची भूमिका हीच त्यांची भूमिका असे स्पष्टपणे ‘हे माझे वैयक्तिक मत आहे’ अशी झालर त्यांनी आपल्या उत्तराला कधी लावली नाही.
२५ जुल १९५३ रोजी जन्मलेले दिवाकर गुप्ता १९७४च्या प्रोबेशनरी ऑफिसरच्या तुकडीतून बँकिंग सेवेत दाखल झाले. दिल्लीच्या सेंन्ट स्टीफन महाविद्यालयातून भौतिक शास्त्राच्या पदवीनंतर पुढे याच विषयात एम. एस्सी. करून प्राध्यापकी करण्याचा त्यांचा विचार होता. परंतु १९७४ साली एकाच वेळी आयआयएम कोलकाता या संस्थेत प्रवेश व स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीत निवड झाल्याचे पत्र आले. घरासाठी कर्ज मिळण्याची खात्री व स्टेट बँकेच्या नोकरीला असलेले वलय, यामुळे त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियात नोकरी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मते एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी स्टेट बँकेच्या शाखाधिकाऱ्याला सरपंचाच्या बरोबरीने लोक मान देत. पण आता तशी परिस्थिती राहिली नसल्याची खंतही त्यांनी बोलून दाखविली. नुकतीच स्टेट बँकेने १७ हजार प्रोबेशनरी ऑफिसर्सची अलीकडच्या काळातील सर्वात मोठी भरती केली, परंतु निवड झालेल्यापकी ८७% उमेदवारांनीच बँकेच्या नोकरीत येणे पसंत केले.
स्टेट बँक समूहात गुप्ता यांची ओळख मन मॅनेजर अशी आहे, असे विचारले असता, निरोपवजा सुरात ते म्हणाले, ‘‘तुमच्या सहकाऱ्यांच्या अडचणी समजून घ्या, त्यावर उपाय शोधण्यास त्यांना मदत करा, पण बँकेची जी धोरणे आहेत ती राबवण्यात कसूर करू नका. भविष्यकाळ तुमचा असेल.’’
नवीन बँकिंग परवाने….
परदेशातील विकसित अर्थव्यवस्थेत तीन-चार मोठय़ा बँकांकडे ७०% व्यवसाय असतो. भारतात सर्वात मोठय़ा स्टेट बँकेकडे १७% बाजारहिस्सा आहे, तर दुसऱ्या क्रमांकावरील बँकेकडे ८% आणि पहिल्या चार बँका मिळून ४०% बँकिग व्यवसाय नियंत्रित करतात. भारताची अर्थव्यवस्था जगात आठव्या क्रमांकावर आहे तर देशातील सर्वात मोठी बँक जगात साठाव्या स्थानी आहे. ही विषमता दूर करायची असेल तर मोठय़ा प्रमाणावर बँकिंग व्यवसाय वाढायला हवा. भारताच्या अर्थव्यवस्थेत आणखी पाच-सहा स्टेट बँका सामावण्याची ताकद नक्कीच आहे. आíथक सर्वसमावेशन हाच यावर उपाय आहे.
छत्तीस वर्षांच्या प्रवासाबद्दल….
प्रवास सुंदरच झाला व खूप काही शिकायला मिळाले. अजूनही मी नवीन गोष्टी शिकतोच आहे. मी बँकेत आलो तेव्हा पर्सनलाइज्ड बँकिंग होते. आता बँकेवर तंत्रज्ञानाचा पगडा आहे. २०१३ मध्ये बँकेचा व्यवसाय १५%नी वाढला. बँकेच्या बचत व चालू खात्यांचे प्रमाण ४६% आहे. वाहन कर्जे ३५%नी वाढली. अर्थव्यवस्था ५%नी वाढत असताना बँकेची १५% वाढ समाधानकारक म्हणायला हवी.
वाढत्या एनपीएबद्दल…
स्टेट बँकेने कर्जाची पुनर्रचना हाती घेतली आहे. सध्याची अर्थव्यवस्था पाहता २०१४मध्ये १% कर्जाची पुनर्रचना होणे अपेक्षित आहे. साधारण ५००० कोटींची कर्जे मार्च २०१४ पर्यंत पुनर्रचित होतील.