१० महिन्यांत १.७८ लाख कोटींचे संकलन
मुंबई : वस्तू आणि सेवा कराचे (जीएसटी) राज्यातील संकलनात डिसेंबरच्या तुलनेत जानेवारीत वाढ झाली आहे. जानेवारीत या करापोटी २०,७०४ कोटींचे राज्यात संकलन झाले. चालू आर्थिक वर्षांत राज्यात जानेवारीपर्यंत १ लाख ७८ हजार कोटींचे एकूण संकलन झाले आहे.
वस्तू आणि सेवा कराचे (जीएसटी) देशात जानेवारीत विक्रमी असे १ लाख ४० हजार कोटींचे संकलन जानेवारी महिन्यात झाल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना आवर्जून सांगितले. याच महिन्यात महाराष्ट्रातून २० हजार ७०४ कोटींचे संकलन झाले. २०२१-२२ आर्थिक वर्षांत एप्रिलनंतर झालेले हे सर्वोच्च संकलन आहे.
डिसेंबर २०२१ मध्ये राज्यात १९,५९२ कोटींचे संकलन झाले होते, तर एप्रिल २०२१ मध्ये सर्वाधिक २२ हजार कोटींचे संकलन झाले होते. त्यानंतर आता २० हजार कोटींचा टप्पा जानेवारीत गाठला आहे. दुसऱ्या लाटेत मे ते सप्टेंबर दरम्यान राज्यातील संकलन घटले होते. संकलन वाढले ही अर्थव्यवस्था सुधारत असल्याचे लक्षण असल्याचे वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी जानेवारीत (२०२१) सारे व्यवहार सुरळीत झाले होते तेव्हा राज्यात १७,९६७ कोटींचे संकलन झाले होते.